दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार; गुन्ह्यांपूर्वी सोशल मीडियावर स्टेटस अन् रील्सचा सुळसुळाट; सायबर आणि पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी.

पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती गंभीर बनली आहे. विशेषतः कात्रज, कोंढवा, बिबवेवाडी, वाघोली आणि इतर उपनगरांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांची दहशत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दिवसाढवळ्या होणारे जीवघेणे हल्ले आणि रक्तरंजित थरारामुळे सर्वसामान्य पुणेकर दहशतीखाली जगत आहेत.

बड्यांवर कारवाई, मग छोट्यांचे काय?

पुणे पोलिस आयुक्तांनी शहरातील बड्या आणि सराईत गुन्हेगारांची परेड घेत त्यांना वठणीवर आणले. या कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत झाले. मात्र, आता या मोठ्या गुन्हेगारांची जागा अल्पवयीन टोळक्यांनी घेतली असल्याचे चित्र आहे. कायद्याचा कोणताही धाक नसल्याप्रमाणे ही अल्पवयीन मुले हातात कोयते आणि धारदार शस्त्रे घेऊन उपनगरांत खुलेआम दहशत माजवत आहेत. मोठ्या गुन्हेगारांवर जरब बसवणाऱ्या पोलिसांचा वचक या ‘छोट्या’ गुन्हेगारांवर का नाही, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

सोशल मीडियावर स्टेटस आणि रील्सचा सुळसुळाट

सध्या गुन्हेगारीचे स्वरूप बदलले असून, सोशल मीडिया हे गुन्हेगारांसाठी दहशत पसरवण्याचे नवे माध्यम बनले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एखादी हत्या किंवा गंभीर गुन्हा करण्यापूर्वी संबंधित आरोपी सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवून विरोधकांना उघडपणे डिवचतात. गुन्हा केल्यानंतरही त्याचे समर्थन करणारे रील्स आणि व्हिडिओ व्हायरल केले जातात.

पोलिस यंत्रणेचे लक्ष नेमके कुठे?

एकीकडे गुन्हेगार सोशल मीडियावर उघडपणे आव्हान देऊन गुन्हे करत असताना, पोलिसांची सायबर सेल आणि गुप्तचर यंत्रणा नेमकी काय करत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हा घडण्यापूर्वीच सोशल मीडियावरील या हालचालींची दखल घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई का केली जात नाही? असा सवाल आता सर्वसामान्यांतून विचारला जात आहे.

उपनगरातील वाढती गुन्हेगारी आणि अल्पवयीन गुन्हेगारांचा हा विळखा वेळीच न तोडल्यास पुण्याची शांतता धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने आता या अल्पवयीन टोळक्यांच्या मुसक्या आवळून शहरातील कायदा-सुव्यवस्था पुन्हा रुळावर आणावी, अशी जोरदार मागणी पुणेकरांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here