वडगाव शेरीत मोहम्मद पैगंबर जयंती मिरवणुकीत वीजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यु झाल्याप्रकरणी मंडळाच्या अध्यक्षासह इतरांवर गुन्हे दाखल.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

काल दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत रथावर चढून झेंडा फिरवणार्‍या दोन तरुणांचा हाय टेन्शन वायरला स्पर्श होऊन मृत्यु झाला. याप्रकरणी मिरवणुक काढणार्‍या मिम बॉईज यंग फ्रेन्ड सर्कल मंडळाच्या अध्यक्षासह चौघांवर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिम बॉईज यंग फ्रेन्ड सर्कलचे अध्यक्ष हुसेन कादर शेख (वय ३५, रा. वडगाव शेरी), ट्रॅक्टर चालक विकास अच्युत कांबळे (वय ३२, रा. वाघोली), साऊंड सिस्टीमचे चालक अक्षय बापू लावंड (वय २८, रा. चंदननगर), एलएडी स्क्रीन लावणारे संतोष धावजी दाते (वय ३६, रा. राजगुरुनगर, खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त वडगाव शेरी येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ट्रॅक्टरवर उभे राहून झेंडा फिरवत असताना झेंडाचा स्टिलचा रॉड स्पर्श वरुन जाणार्‍या हाय टेन्शन वायरला झाला. त्यामुळे वीजेचा धक्का बसून जाकीरिया बिलाल शेख (वय २०, रा़. वडगाव शेरी), अभय वाघमारे (वय १७, रा. वाडेश्वरनगर, वडगाव शेरी) यांचा मृत्यु झाला.

याबाबत चंदननगर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार पंकज वसंत मुसळे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना वडगाव शेरी येथील आनंद पार्क रोडवरील भाजी मंडई चौकात रविवारी पावणे अकरा वाजता घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैगंबर जयंतीनिमित्त मिम बॉईज यंग फ्रेन्ड सर्कल यांनी मिरवणुकीचे नियोजन केले होते. अध्यक्ष हुसेन शेख यांनी पोलिसांनी दिलेल्या शर्ती व अटीचे सूचनांचे पालन न करता त्याकडे दुर्लक्ष करुन मिरवणुकीत झेंडे व स्टीलचे पाईप उपलब्ध करुन दिले.

विकास कांबळे याने ट्रॅक्टर ट्रॉलीचे फाळके काढून विना परवाना लाकडी स्टेज टाकला. अक्षय लावंड याने साऊंड सिस्टिम लावून एकावर एक साऊंड लावून भिंती उभारली तर मर्यादापेक्षा उंची निर्माण केली. तसेच संतोष दाते याने ट्रॅक्टरवर लोखंडी फ्रेम लावून एलएडी स्क्रीन लावून त्याची मर्यादेपेक्षा अधिक उंची निर्माण केली.

त्यामुळे अभय वाघमारे हा लोखंडी फ्रेमवर चढून हातात स्टीलचा पाईप असलेला झेंडा फिरवत होता. त्यावेळी त्याच्या उंचीवर असलेली महावितरणची उच्च दाब वीज वाहिनीला स्टील पाईपचा स्पर्श झाला. त्यामुळे वीजेचा धक्का बसून त्यात त्याचा जागीच मृत्यु झाला. जाकीरिया शेख यालाही वीजेचा धक्का बसून त्यात त्याचा मृत्यु झाला. सहायक पोलीस निरीक्षक माने पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here