पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
कोंढव्यात बेकायदेशीरपणे चालू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कोंढव्यातील ” मॅश “ हॉटेलमध्ये खुले आम हुक्का पार्लर सुरु असल्याचे दिसून आले आहे. कोंढवा पोलिसांनी या हॉटेलवर कारवाई करुन ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील राहुल रासगे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, हॉटेल मालक अली ईरानी वय ६६, रा. होले हाईटस सोसायटी, उंड्री, हॉटेल मॅनेजर अली सय्यद वय २८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा, हुक्का भरणारे थॉमस सुजय मंडल वय ३०, रा. उंड्री, मुळे प. बंगाल, रंजन समर्थ पत्रा वय २७, रा. मॅश हॉटेल, उंड्री, राजकुमार वामन पंडीत,वय ३०, रा. कृष्णानगर, मोहम्मदवाडी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे,पोलीस उपनिरीक्षक गावडे, हवालदार हिरवे, पोलीस अंमलदार चिंचकर, राहुल रासगे हे पेट्रोलिंग करत कडनगर येथे आले होते.
त्यावेळी पोलीस अंमलदार चिंचकर यांना बातमी मिळाली की, न्याती चौकाजवळील रायजिंग स्टार फुटबॉल क्लबचे शेजारील मॅश हॉटेल येथे अवैध रित्या हुक्का विक्री चालू आहे. पोलिसांनी रात्री येथे छापा घातला. त्यावेळी हॉटेलमध्ये ३ टेबलवर ८ जण हुक्का पित असल्याचे आढळून आले.
हॉटेलमधील कॉटेज शेजारी असलेल्या छोट्या रुममध्ये आणखी काचेचे ४ छोटे हुक्का पॉट मिळून आले. पोलिसांनी हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट व इतर साहित्य असा ३६ हजार ३०० रुपयांचा माल जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे तपास करीत आहेत.