पुणे महापालिका मुख्य इमारतीतील महिलांसाठी गाजावाजा करून स्थापन झालेला हिरकणी कक्ष गेल्या काही महिन्यांपासून गायबच.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
विधानभवनात एका रात्रीत हिरकणी कक्ष स्थापन होतो मग पुणे महानगर पालिकेत का नाही पुणे महापालिका मुख्य इमारतीतील महिलांसाठी गाजावाजा करून स्थापन झालेला हिरकणी कक्ष गेल्या काही महिन्यांपासून गायबच असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महापालिकेतील मुख्य इमारतीतील महिला कर्मचारी तसेच महापालिकेत कामानिमित्त येणार्या महिला नागरीक यांच्यासाठी २०१६ साली गाजावाजा करुन उभारण्यात आलेला हिरकणी कक्ष गेल्या काही महिन्यांपासून गायब झाला आहे.
याठिकाणी स्तनदा मातांना बालकांना दूध पाजण्याची व्यवस्था तसेच कुणा महिलेला बरे नाहीसे वाटायला लागले तर थोडा वेळ विश्रांती घेण्याची सोय होती. महापालिका मुख्य इमारतीतील तळमजल्यावर हा कक्ष उभारण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वी तिथे दिव्यांग कक्ष सुरु करण्यात आला व हिरकणी कक्ष इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील काका वडके सभागृहा शेजारील खोलीत कागदोपत्री हलवण्यात आला. त्या नवीन जागेची पाहणी केली असता तेथे हिरकणी कक्षाचा बोर्डही नाही व व्यवस्था ही नाही. त्या ठिकाणी मालमत्ता विभागाच्या फायली पडल्या आहेत आणि त्या विभागाचे दोन कर्मचारी तिथे काम करीत असल्याचे दिसून आले आहे.
महापालिका प्रशासन आपल्याच महिला कर्मचारी व महिला नागरीक यांच्या विषयी कीती संवेदना शून्य आहे हे यातून उभे राहणारे चित्र व्यथित करणारे आहे.विधानभवनात एका रात्रीत हिरकणी कक्ष उभा राहिला या पार्श्वभूमीवर किमान आता तरी हा हिरकणी कक्ष सर्व सुविधांनिशी तातडीने सुरु करुन आपल्या महिला कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा.असे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पुणे महानगर पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.