पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुण्यातील खडक पोलिस ठाण्यातील एका महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकाला धमकी दिल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.हा प्रकार घोरपडे पेठेतील महापालिका वसाहत परिसरात घडला आहे.याबाबत खडक पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
रवींद्र उर्फ सोन्या संजय खंडागळे रा. पीएमसी कॉलनी, घोरपडे पेठ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक गिरीजा म्हस्के यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक गिरीजा म्हस्के या रात्री गस्तीवर होत्या.घोरपडे पेठेतील महापालिका वसाहत परिसरात आरोपी खंडागळे थांबला होता.तु माझ्या भावाच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खोटा गुन्हा दाखल केला आहे.
मी तुला सोडणार नाही, अशी धमकी खंडागळे याने फिर्यादी यांना दिली. खंडागळे याने आरडाओरडा करुन शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी खंडागळे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.