बाउन्सर ठेवणाऱ्या कंपन्यांवर वचक कोणाचा?
पोलिस आयुक्तांची परवानगी नसल्याने भांडणाचे प्रकार वाढलेत.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहर पोलिस आयुक्तालय मार्फत अनेक परवानगी दिल्या जातात, तर सिक्युरिटी गार्ड साठी देखील परवानगी दिल्यानंतरच सिक्युरिटी गार्ड कंपनी सिक्युरिटी गार्डची सर्विस अनेक कंपन्या, मॉल व इतर ठिकाणी पुरवली जाते. परंतु आज पुणे शहरात “नाईटलाईफ” चे उदोउदो केले जात आहे. रात्रीच्या वेळी पुण्यातील पब संस्कृतीने आता जन्म घेतला आहे.
पब मध्ये रोजचाच धांगडधिंगा, दारू पिऊन रस्त्यावर हौदोस घातले जात असल्याचे आपण पाहत असतो, तर त्या नाईटलाईफ हॉटेल मधील हौदोस घालणाऱ्यांना बाउन्सर आपली ताकद दाखवून तरूण तरूणींना मारहाण करत असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यातूनच पुणे सिटी टाईम्सला प्रश्न पडला होता की, ही दादागिरी करणाऱ्या गावगुंड बाऊन्सरांना परवानगी कोण देतं. याची माहिती पुणे पोलिस आयुक्तालयाकडे माहिती अधिकारात मागितली असता, पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या हॉटेल,पब,रेस्टॉरंट मध्ये बाऊन्सर ठेवणे बाबत परवाना पोलीस आयुक्त कार्यालया मार्फत देण्यात येत नाही असे उत्तर जन माहिती अधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासन) नंदनी वग्याणी यांनी दिले आहे.
पुणे शहरातील अनेक हॉटेल, पब, रेस्टॉरंट, लग्न समारंभ, उदघाटन व इतर खाजगी कार्यक्रमात बाऊन्सरचा क्रेझ असल्याचे दिसते. परंतु याला अपवाद वगळता काही ठिकाणी वादविवाद झाल्याने मारहाण पर्यंत प्रकरण गेल्याने बाउन्सर पळून जातात. मग अशा गुन्हेगार वृत्तीच्या बाउंसरांवर वचक कोणाचा असणार?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पुणे पोलिस आयुक्तालया मार्फत जर सिक्युरिटी गार्ड कंपन्यांना गार्ड पुरवण्यासाठी परवाना दिला जात असेल तर मग बाउन्सर पुरवणाऱ्या कंपनीला परवानगी घेण्याची सक्ती का केली जात नाही? पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार याबाबत गंभीर विचार करणार का? असा प्रश्न पुणेकरांनी विचारला आहे.