पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी
खराडी परिसरातील पोलिस ठाण्याजवळील नाल्यात पुन्हा एकदा अनधिकृत होर्डिंगचा पाया रचला जात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी यापूर्वीही पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने कारवाई करून अनधिकृत होर्डिंग हटवले होते. मात्र, “मी पुन्हा येईन” या थाटात तेच होर्डिंग पुन्हा उभे राहत असल्याने कारवाईची प्रभावीता आणि विभागाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खराडी परिसरात महापालिकेच्या जागा, नाले, रस्ते, चौक तसेच सार्वजनिक संस्थांच्या परिसरात नियमबाह्य होर्डिंग्ज उभी राहत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. तरीही या प्रकाराला आळा बसत नसल्याने काहींच्या आशीर्वादाशिवाय हा प्रकार शक्य आहे का, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त आणि परवाना निरीक्षक यांनी केवळ अधूनमधून कारवाई करण्यापेक्षा खराडी परिसरातील सर्व होर्डिंग्जचे विशेष सर्वेक्षण करून, कोणती होर्डिंग्ज नियमबाह्य आहेत, कोणती महापालिकेच्या जागेवर आहेत आणि कोणत्या होर्डिंग्जना वैध परवाने आहेत, याचा सार्वजनिक अहवाल जाहीर करण्याची मागणी होत आहे.

यासाठी विशेष तपासणी पथक नेमून अनधिकृत होर्डिंग्जवर कायमस्वरूपी कारवाई होणार की पुन्हा एकदा कारवाईचे फक्त नाटक रंगणार, याकडे नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

अनधिकृत होर्डिंग्ज उभारली जात असताना संबंधित प्रशासनाला त्याची माहिती नसणे अशक्य आहे. त्यामुळे अशा प्रत्येक बेकायदा होर्डिंगसाठी केवळ उभारणाऱ्यांवर नव्हे, तर संबंधित क्षेत्रातील जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. वारंवार कारवाई करूनही त्याच ठिकाणी पुन्हा होर्डिंग उभी राहत असतील, तर ती केवळ अंमलबजावणीतील त्रुटी नसून देखरेख आणि उत्तरदायित्वाचा गंभीर प्रश्न आहे.
प्रश्न इतकाच — खराडीच्या नाल्यात उभ्या राहत असलेल्या या अनधिकृत होर्डिंगच्या ‘बारशाला’ आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त आणि परवाना निरीक्षक उपस्थित राहणार, की या बेकायदा उभारणीवर कायमचा आळा घालणार? क्रमशः




