पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी,
पुणे शहरात सध्या ‘रक्षकच भक्षक’ होत असल्याचे चित्र दिसत आहे. पोलिसांच्या गैरवर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत आहे. रोज कुठे ना कुठे पोलिसांविरुद्ध कारवाई होत असल्याचे चित्र आहे. अशाच एका प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याने शोरूम मालकाच्या वडिलांचे डोके फोडल्याच्या घटनेनंतर संबंधित कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
हकिकत अशी आहे की,डेक्कन जिमखाना परिसरातील एक शोरूम संदीप ज्ञानेश्वर रोकडे या पोलीस कर्मचाऱ्याने भाड्याने घेतले होते. त्याने दीर्घकाळ भाडे थकीत ठेवले. भाडे मागितल्यावर शोरूम मालक प्रयांक किशोर पोरवाल यांच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ केली. शिवाय, १० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोरवाल यांच्या घरी जाऊन लोखंडी वस्तूने त्यांच्या वडिलांच्या डोक्यात व डाव्या हातावर वार करून गंभीर जखमी केले.
या गंभीर प्रकारानंतर पोलीस उपायुक्त (झोन-१) राजलक्ष्मी शिवणकर यांनी संदीप ज्ञानेश्वर रोकडे यास तात्काळ निलंबित केले.संदीप रोकडे हे मोटार परिवहन विभागात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी २०२१ मध्ये प्रयांक किशोर पोरवाल यांचे डेक्कन जिमखान्यातील शोरूम भाड्याने घेतले होते. बराच काळ भाडे थकीत ठेवल्याने आणि वारंवार मागणी केल्यावरही टाळाटाळ केल्याने वाद निर्माण झाला.
कार्यालयात येऊन शिवीगाळ करणे आणि शेवटी १० नोव्हेंबरला रात्री घरी जाऊन लोखंडी वस्तूने मारहाण करणे, असा हा धक्कादायक प्रकार आहे.पोलीस दलाची शिस्त व प्रतिमा मलिन करणाऱ्या या बेजबाबदार वर्तनामुळे संदीप रोकडे याला निलंबित करण्यात आले आहे. या निलंबनामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.




