पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन झाल्यानंतरही कार्यभार स्वीकारण्यास दोन्ही नवे अधिकारी टाळाटाळ का करतायत?
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी लक्ष घालणार का?
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने कोरेगाव पार्क येथील जमीन बेकायदेशीरपणे खरेदी केल्याच्या प्रकरणात व बोपोडी जमीन घोटाळ्याची चौकशी प्ररकरणात पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांना १२ दिवसांपूर्वी तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. मात्र निलंबनानंतर कार्यालयाचा कारभार पूर्णपणे रामभरोसे झाला आहे.
निलंबनानंतर पुणे शहर तहसीलदार पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रभारी करमणूक कर अधिकारी सतीश थेटे यांच्याकडे देण्यात आला. मात्र थेटे गेल्या १२ दिवसांत एकदाही कार्यालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे नुकतीच अस्मिता माने यांची पुणे शहर तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली, तरी त्यांनीही अद्याप कार्यभार स्वीकारलेला नाही. परिणामी तहसीलदारांची खुर्ची सतत रिकामीच आहे.पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रत्यक्षात लक्ष घालण्याची मागणी पुणेकरांनी केली आहे.
” तहसीलदार नसल्याने कामकाज ठप्प ”
तहसीलदार नसल्यामुळे गौण खनिज उत्खनन परवाने, चौकश्या, सुनावण्या, माहितीचा अधिकार अपीले, ईटीएस मोजणी, कारवाई आदी महत्त्वाची कामे प्रलंबित आहेत. याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसत असून, त्यांना कार्यालयाच्या चकरा मारण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.




