माहिती अधिकाराचे शुल्क भरूनही माहिती ‘आज देतो, उद्या देतो’ म्हणत टाळाटाळ.
राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार दाखल करणार.
पुणे सिटी टाईम्स (PCT) प्रतिनिधी.
आज माहिती अधिकार कायद्याला २० वर्षे पूर्ण झाली असली, तरी आजही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून या कायद्याला कागदी घोडे उडवले जात आहेत. वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयातील आकाशचिन्ह विभागाकडे अजहर अहमद खान यांनी माहिती अधिकाराखाली होर्डिंगची माहिती मागितली होती.
त्या संदर्भात आकाशचिन्ह परवाना निरीक्षक स्वप्नील कदम यांनी खान यांना १२० रुपये शुल्क भरण्याचे सांगितले. दोन-तीन वेळा खान यांनी क्षेत्रीय कार्यालयात चकरा मारल्या; परंतु शुल्क भरून घेण्यासाठी स्वप्नील कदम उपस्थित नव्हते. अजहर खान यांनी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी शासकीय शुल्क भरून कदम यांना फोन करून कल्पना दिली व माहिती दोन दिवसांत देण्याची मागणी केली.

परंतु कदम यांनी पुन्हा ‘आज मी बाहेर आहे, मीटिंगमध्ये आहे, उद्या देतो’ म्हणत वेळ टाळली. अखेर ३० ऑक्टोबर रोजी माहिती देण्याचे कबूल केले व खान यांना पुन्हा कार्यालयात बोलावले. परंतु खान हे काही कामात अडकले असल्याने त्यांनी आपल्या भाच्याला पाठवले. स्वप्नील कदम यांचा पुन्हा तोच समस्या दिसून आली – ‘जरा थांबा, कॉम्प्युटर बिझी आहे, कव्हरिंग लेटर बनवण्यासाठी वेळ लागेल’ अशी अनेक कारणे सांगून दीड तास ताटकळत उभे राहायला लावले.

शेवटी हातात माहिती देण्यात आलेली नाही. याचाच अर्थ पाणी कुठेतरी मुरत आहे? होर्डिंगधारकांसोबत साटेलोटे तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा कामचुकार जनमाहिती अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी अजहर अहमद खान यांनी केली आहे. तर १२० रुपयांचे शुल्क भरण्यासाठी ४ चकरा – म्हणजे १२० भरण्यासाठी ४०० रुपयांचा पेट्रोल? याबाबत लवकरच राज्य माहिती आयुक्त व पुणे मनपा आयुक्तांकडे तक्रार करून भरपाईची मागणी केली जाणार आहे.




