पुण्यातील अन्नधान्य वितरण कार्यालयाचा भोंगळ कारभार! गणेश ठरला शासकीय बळी?

0
Spread the love

गणेशच्या मृत्यूला कारणीभूत कोण?

९ महिन्यांपासून पगारच नाही? दिवाळीसण देखील अंधारात.

शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी.

 पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

पुणे शहरातील अन्नधान्य वितरण कार्यालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळे एका कर्मचाऱ्याचा नाहक बळी पडला आहे. हकीकत अशी की, अन्नधान्य वितरण कार्यालयात माथाडी कामगार म्हणून गणेश गजकाटे कामाला होता.

त्याच्यासह ४१ माथाडी कामगारांना तब्बल ९ महिन्यांपासून शासनाने पगारच काढला नसल्याने त्या ४१ जणांवर उपासमारीची वेळ आली आहे. गणेश हा येरवडा येथे राहणारा असून, तो अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या निगडीत कामाला होता. त्याने वरिष्ठांना होणाऱ्या त्रासाबद्दल अनेक वेळा सांगितले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

परंतु वरिष्ठांनी त्याकडे दुर्लक्ष केले. गेल्या ९ महिन्यांपासून अन्नधान्य वितरण अधिकाऱ्याने पगारच काढला नसल्याने गणेशवर उपासमारीची वेळ आली होती. रोजचे लागणारे पेट्रोल, घरखर्च व इतर खर्च निघेनासे झाले होते. त्यामुळे गणेश गजकाटे हा मानसिक तणावाखाली होता. कारण पगार वेळेवर मिळत नसल्याने खच्चीकरण आणि कर्जाचा बोजा वाढत होता.

त्या मानसिक तणावातून गणेशला हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आला आणि तो मृत्यूमुखी पडला. त्याच्या जाण्याने परिवाराला चांगलाच धक्का बसला आहे. मयताच्या दिवशी गणेशच्या मुलीने हंबरडा फोडत असताना, त्यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी पोहोचताच मुलगी म्हणाली, “साहेब, माझ्या वडिलांना खूप त्रास दिला गेला? माझ्या वडिलांचे खच्चीकरण केलेत? पगार वेळेवर न मिळाल्याने माझे पप्पा आज या जगात नाहीत? गणेशच्या मुलीचे अश्रू पाहून इतरांच्या डोळ्यातही पाणी आले. ९ महिने पगार न काढणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी माथाडी कामगार संतोष लिंमकर यांनी केली आहे.

“आमच्या मृत्यूची वाट पाहिली जात आहे का?”

“गेल्या ९ महिन्यांपासून आम्हाला पगार दिला गेलेला नाही. फक्त गेल्या महिन्यात एक महिन्याचा पगार हातात देण्यात खूप मोठे काम केले आहे. आमच्यासाठी आवाज उठवणारा कोणी वालीच नाही. अधिकाऱ्यांना सांगून सांगून आमची जीभ घासली आहे. परंतु अधिकारी गेंड्याचे कातडे घालून बसले आहेत; त्यांना आमचा मृत्यू झाला तरी फरक पडणार नाही. शासनाने त्वरित दखल घ्यावी, नाहीतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसू.”माथाडी कामगार संतोष लिंमकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here