पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे यांना शिवाजीनगर न्यायालयाने नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. न्यायालयीन कामकाजावेळी गणवेशातच हजर राहणे हे पोलिसांना कायद्यानुसार बंधनकारक आहे. ड्रग तस्कर ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करताना तपास अधिकारी आणि गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे साध्या वेशातच न्यायालयात आले होते.
न्यायालयाने तांबे यांच्यावर नियमांची पायमल्ली केल्याचा ठपका ठेवत शिस्तभंगाची नोटीस बजावली. तुमचा लेखी खुलासा शहर पोलिस आयुक्तांमार्फत १५ दिवसात सादर करावा तसे न केल्यास न्यायालय शिस्तभंग प्राधिका-याकडे अहवाल पाठवेल असे न्यायालयाने नोटीसमध्ये नमूद केले आहे.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.सी बिराजदार यांनी गणवेशामध्ये का आला नाहीत? असे विचारले असता तांबे यांनी पुढच्या वेळी नक्की काळजी घेईन असे सांगितले. पण न्यायालयाला हे उत्तर समाधानकारक वाटले नाही. तांबे यांनी नियमांचे उल्लंघन आणि भंग केला हे त्यांचे कृत्य इतर पोलिस संवर्गांसाठी नक्कीच अनुकरणीय नाही. न्यायालयीन कामकाजावेळी उपस्थित राहाण्याचे पोलिसांवर कायदेशीर बंधन आहे.
तसे न केल्याने केवळ पोलिस खात्याच्याच नव्हे तर न्यायालयाच्या प्रतिमा व प्रतिष्ठेस बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे नियमांचा भंग करणा-या या कृत्यास गैरवर्तन आहे. असे समजून शिस्तभंग प्राधिकाऱ्याकडे अहवाल का पाठविण्यात येऊ नये याबाबत लेखी खुलासा ही नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसात शहर पोलिस आयुक्त यांच्यामार्फत सादर करावा असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.