पोलिसच करत आहेत सिनेमातील क्राईम दृश्य? मग दाद कोणाकडे मागायची?
पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी
पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षास दुसऱ्याच्या मोबाईलवरून कॉल करून खोटी माहिती देवुन बांधकाम ठेकेदारास वेठीस धरणाऱ्या २ पोलिस अंमलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिस उपायुक्तांनी तडकाफडकी निलंबीत केले आहे.
पोलिस अंमलदार निखिल राजेंद्र शेडगे आणि पोलिस अंमलदार आकीब सत्तार शेख अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. ते दोघेही डेक्कन पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. अधिक माहिती अशी की , दि . १२ ते १३ मे २०२३ च्या रात्री दोघांची नेमणुक प्रभात पोलिस चौकीच्या हद्दीत बीट मार्शल म्हणून ड्युटी होती.
निखिल शेडगे व आकिब शेख यांनी एका हॉटेलमध्ये जाऊन तेथील कामगाराचा फोन घेऊन नियंत्रण कक्षाला फोन केला. प्रभात चौकी परिसरात रात्री रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याने त्रास होत असल्याचे सांगितले. नियंत्रणाने बीट मार्शल शेडगे व शेख यांना वरील माहिती दिल्यानंतर ते कामाच्या ठिकाणी गेले. त्यांनी तेथील कंत्राटदाराला सांगितले की, आम्हाला कंट्रोल वरून कॉल आला असून तुमची वर्क ऑर्डर आणि रात्री काम करण्याची परवानगी दाखवा किंवा काम थांबवा.
दोघांनी काहीही न ऐकता फिर्यादीला पोलिस ठाण्यात नेले. याप्रकरणी ठेकेदाराने वरिष्ठ पोलिसात तक्रार दाखल केली.तक्रारीची चौकशी केली असता पोलीस हवालदार शेडगे व शेख यांनी दुसऱ्या मोबाईलचा वापर करून कंट्रोलला फोन करून ठेकेदाराला विनाकारण त्रास दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी दोघांनाही निलंबित केले आहे.