नागरिक व कंपन्यांनी पुणे महापालिकेला कोविड संकटाचा मुकाबला करण्यासाठी दिलेली ७ कोटी रुपयांची देणगी विना वापर पडूनच ;तर ५४ लाख रूपये मिळाले व्याज

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

कोविड काळात नागरिक तसेच विविध कंपन्यांनी पुणे महापालिकेला कोविड संकटाचा मुकाबला करण्यासाठी दिलेली ७ कोटी रुपयांची देणगी विना वापर पडून असल्याचे माहिती अधिकारात ( RTI) समोर आले आहे.कोविड जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने मार्च २०२० मध्ये कोविड संकटाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांना व कंपन्यांना महापालिकेला देणगी देण्यासाठी आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत अनेक नागरिक व कंपन्यांनी पुणे महापालिकेला २०२०-२१ मध्ये ४.८९ कोटी तर २०२१-२२ मध्ये ३.१० कोटी एवढ्या रकमेच्या देणग्या दिल्या.

मात्र महापालिकेने २०२०-२१ मध्ये यातील एकही पैसा खर्च केला नाही तर २०२१-२२ मध्ये १.३० कोटी रुपये करोना बेड व ऑक्सिजन वर खर्च केले. आजवर यातील शिल्लक रकमेवर ५४ लाख रुपये व्याज महापालिकेला मिळाले आहे व आज रोजी या कोविड सीएसआर खात्यात ७.२२ कोटी रुपये पडून आहेत.करोना काळात नागरीकांचे झालेले प्रचंड हाल बघता देणगी म्हणून आलेले कोट्यावधी रुपये खर्च न करू शकण्याचा करंटेपणा करणाऱ्या पुणे महापालिकेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.

यापुढे एखादी आपत्ती आली तर नागरिक महापालिकेला मदत करायला पुढे येतील का? असा विचारही आपल्या व आपल्या अधिकाऱ्यांच्या मनात आला नाही याचे वैषम्य वाटते. प्रशासन प्रमुख म्हणून यामध्ये मनपा आयुक्तांची जबाबदारी मोठी आहे.यावर कळस म्हणजे या पैशांचा वापर महापालिका इस्पितळ व दवाखाने यातील उपकरणे खरेदीवर करण्याऐवजी पुणे मनपा आरोग्य विभागाने एका खाजगी इस्पितळासाठी ( बोपोडी आय हाॅस्पिटल) दोन कोटी रुपयांची उपकरणे घेण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

आजच्या सोमवारच्या माहिती अधिकार दिनात ही सगळी माहिती मिळाली म्हणून निदान या गोष्टी चव्हाट्यावर तरी आल्याचे सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी सांगितले.या ७ कोटी रुपयांच्या निधीतून पुणे महापालिका इस्पितळे आणि दवाखाने यामध्ये आवश्यक ती यंत्रसामुग्री घेऊन गरजू पुणेकर रुग्णांची सोय करावी अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here