पुणे सिटी टाइम्स (PCT) प्रतिनिधी
टोइंग व्हॅनवरील कर्मचारी आणि पोलिस यांची मिलीभगत असल्याचे वारंवार सांगितले जात असले, तरी वरिष्ठ अधिकारी नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे टोइंग व्हॅनवरील कर्मचारी आणि पोलिसांना मोकळे रान मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी येथे टोइंग व्हॅनवरील खासगी कर्मचारी आणि पोलिस यांच्या सांगण्यावरून ५०० रुपये घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

रात्रीच्या वेळी नागरिकांना त्रास देऊन वाहतूक पोलिस नेमके काय साध्य करत आहेत? एका तरुणाची दुचाकी नो-पार्किंगमधून टोइंग व्हॅनद्वारे उचलण्यात आली आणि त्यानंतर पोलिस व टोइंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांचा ‘खेळ’ सुरू झाला. महिला पोलिस कर्मचाऱ्यासमोर टोइंग व्हॅनवरील कर्मचारी म्हणतो, “१,२३६ रुपये दंड भरावा लागेल.” यावर दुचाकीस्वाराने “५०० रुपये देतो,” असे सांगितले आणि त्याने ५०० रुपये देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टोइंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या ‘सेटलमेंट’दरम्यान महिला पोलिस कर्मचाऱ्याने कोणताही हस्तक्षेप केला नसल्याचे व्हिडिओद्वारे स्पष्ट झाले आहे, ज्यामुळे तिची सहमती होती असे दिसते. आता या महिला पोलिस कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. क्रमशः
(टोइंग व्हॅनबाबत तुमच्याकडे व्हिडिओ असल्यास, तो 7276766762 या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवावा.)
टोइंग व्हॅनचा करारनामा का रद्द होत नाही?
टोइंग व्हॅनचा करारनामा करताना असे नमूद आहे की, टोइंग व्हॅनवरील कर्मचाऱ्याने नागरिकांकडून पैसे मागितल्यास आणि ते सिद्ध झाल्यास करारनामा रद्द करण्यात येईल. मात्र, प्रत्यक्षात असे होते का? की हा करारनामा फक्त नावापुरता आणि नागरिकांना दाखवण्यासाठीच आहे?

