पोलिस दलात उडाली खळबळ.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
वरिष्ठांनी ड्युटी लावलेल्या ठिकाणी न जाता भलत्याच ठिकाणी वसुली करणाऱ्या वसुली बहाद्दरांना चांगलाच दणका दिला आहे. वरिष्ठांनी दखल घेत पुणे वाहतूक विभागाने तात्काळ कारवाई करत ३ वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. हे पोलीस वाहतूक नियंत्रणाकडे दुर्लक्ष करून वाहनचालकांकडून दंड वसूल करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
१) संतोष चंद्रकांत यादव, २) बालाजी विठ्ठल पवार आणि ३) महिला पोलीस शिपाई मोनिका प्रवीण करंजकर अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावं आहेत.
यादव यांची ड्युटी SP चौकात, पवार यांची हिराबाग चौकात, तर करंजकर यांची ड्युटी भावे चौकात होती. मात्र त्यांनी आपापल्या चौकात न राहता पुरम चौकात जाऊन वाहनचालकांना थांबवत दंड आकारल्याचं निदर्शनास आलं.
ही बाब स्पष्ट होताच वाहतूक विभागाने कोणतीही दिरंगाई न करता तिघांनाही निलंबित केलं. पुणे शहरात रोजचीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असताना, नियोजनाऐवजी दंड वसुलीवर भर देणं ही गंभीर बाब मानली जात आहे. वरिष्ठांनी असे नियमबाह्य काम करणाऱ्यांची कुंडली काढून इतर ठिकाणीही असेच स्टिंग ऑपरेशन करावे अशी मागणी पुणेकरांकडून केली जात आहे.