खराडीत महानगरपालिकेच्या जागेत पुन्हा अनधिकृत होर्डिंग; कारवाईनंतरही ‘आशीर्वाद’ कुणाचा?

0
Spread the love

आकाश चिन्ह परवाना निरीक्षकांचे सोईस्कर दुर्लक्ष, खरंच दुर्लक्ष की साटेलोटे?

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी 

प्रभाग क्रमांक ४, खराडी-वाघोली परिसरातील विठ्ठल नगर, खराडी येथे मारवेल एनिग्मा सोसायटी शेजारी महानगरपालिकेच्या जागेत रस्त्यालगत दोन अनधिकृत होर्डिंग पुन्हा उभारण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणावरील अनधिकृत होर्डिंगवर मागील महिन्यातच कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही पुन्हा होर्डिंग उभारले गेल्याने संबंधितांना कोणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, होर्डिंग स्पष्टपणे दिसावे यासाठी परिसरातील वृक्षांची तोड अथवा छाटणीही करण्यात आली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जर वृक्षतोड बेकायदेशीररीत्या झाली असेल, तर त्याबाबत जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

अनधिकृत होर्डिंगमुळे महानगरपालिकेच्या महसुलाचे  दर महिन्याला लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. जाहिरात शुल्क आणि परवानगी शुल्क न भरता उभारण्यात आलेल्या होर्डिंगकडे आकाश चिन्ह परवाना निरिक्षक का दुर्लक्ष करत आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.

मागील कारवाईनंतरही पुन्हा होर्डिंग उभारले जाणे ही बाब गंभीर असून, यामागील सूत्रधार कोण, संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती तपासणी केली, तसेच महानगर पालिकेच्या महसूलावर डल्ला मारणाऱ्यांवर काय कारवाई होणार? आणि परवाना निरिक्षकांनी दुर्लक्ष केल्याप्रकरणी आकाश चिन्ह परवाना उपायुक्त संदिप कदम यांनी तातडीने खुलासा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. क्रमशः 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here