पोलिस आयुक्तांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करावा.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
रस्त्यात अडथळा होत असलेली दुचाकी काढण्यास सांगितल्याचा राग
अनावर झाल्याने पुण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने ५० वर्षांच्या व्यापारी महिलेला थेट मारहाण केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सदरील घटना ही कुठल्या गावात नव्हे तर शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात घडली आहे.
पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मंडई पोलिस चौकीत जबर मारहाण करण्याची घटना आहे. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.
महात्मा फुले मंडई चौकीच्या शेजारील दुकानासमोरील रस्त्यात दोन साध्या वेशातील पोलिस कर्मचाऱ्यांनी दुपारी एकच्या सुमारास दुचाकी उभी केली. ती रस्त्यात असल्याने दुकानदार महिलेने बाजूला घेण्यास सांगितली.
परंतु, ‘तुम्ही सांगणारे कोण’,अशी विचारणा करीत त्यांनी दुचाकी काढण्यास नकार दिला. त्यावेळी झालेल्या वादातून साध्या वेशातील एका कर्मचाऱ्याने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर तो कर्मचारी पोलिस चौकीत गेला.
‘साहेबांनी तुम्हाला आतमध्ये बोलविले आहे,’ असे सांगून महिलेला चौकीत बोलविले.त्यावेळी तेथे कोणी नव्हते. तेथे त्या कर्मचाऱ्याने महिलेला जबर मारहाण केली. त्यामुळे महिलेचा डोळा सुजला असून, चेहरा आणि डोक्याला मार लागला.
त्यानंतर तो कर्मचारी तेथून निघून गेला.मारहाण झालेल्या महिलेने ससून रुग्णालयात उपचार घेतले आणि पोलिसांशी संपर्क साधला. या घटनेबाबत परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे म्हणाल्या, “या घटनेची गंभीरपणे चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.