पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
फेरफार नामंजुर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या व खासगी व्यक्तीसह मंडल अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मंडल अधिकारी श्रीधर भागचंद आचारी वय ५२, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव आणि खासगी व्यक्ती निशाांत तुकाराम लोहकरे, वय ३७, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदार यांनी ७ मार्च २०२४ रोजी गिरवली तलाठी कार्यालयात फेरफार नामंजुर होण्याबाबत तसेच त्याच्या मंजुरीला हरकत असल्याचा अर्ज दिला होता. या अर्जाची सुनावणी मंडल अधिकारी श्रीधर आचारी याच्याकडे होती. तक्रारदार यांनी आचारी यांची भेट घेतल्यावर त्याने निशांत लोहकरे यांना भेटण्यास सांगितले.
तक्रारदार निशांत लोहकरे याला भेटले असता त्याने श्रीधर आचारी मागतील त्याप्रमाणे पैसे द्या असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे आचारी यांना भेटले असता त्यांनी तक्रारदार यांचे फेरफार ना मंजुर करण्याकरीता १० हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी करताना तडजोडीअंती श्रीधर आचारी याने ५ हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
त्यानंतर घोडेगाव येथील मंडल अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला.तक्रारदार यांच्याकडून ५ हजार रुपये स्वीकारताना श्रीधर आचारी याला पकडण्यात आले.
लाच देण्याबाबत प्रोत्साहन दिले म्हणून निशांत लोहकरे यालाही अटक करण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पोलीस निरीक्षक रुपेश जाधव तपास करीत आहेत.