पोलिसांसमोर धमकी देणाऱ्या पब मालकाची मुजोरी वाढली आहे. यात राजकीय हस्तक्षेप असल्यानेच ही हिंमत वाढत आहे का?
पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
१४ ऑगस्ट मध्यरात्री म्हणजे बारानंतर १५ ऑगस्ट रोजी ड्राय डे असताना पबमध्ये दारूविक्री सुरू असल्याची तक्रार केल्यानंतर तक्रारदारालाच पबमध्ये उपस्थित असलेल्या पब मालकाने व त्याच्या साथिदारांनी पोलिसांच्या उपस्थितीत शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी बॉलर पब मालक आर्यन नवले याच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १४ ऑगस्टच्या मध्यरात्री उघडकीस आली. सलमान खान यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
माहितीनुसार, ड्राय डे असूनही बॉलर पबमध्ये मध्यरात्री दारूविक्री सुरू असल्याची माहिती तक्रारदार सलमान खान यांनी नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर येरवडा पोलिसांची पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिस पाहणी करत असताना तक्रारदारालाही पबच्या आत जाऊ देण्याची विनंती करण्यात आली. मात्र, त्यावेळी पबमध्ये उपस्थित आर्यन नवलेने तक्रारदाराला आत येण्यास मज्जाव करत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तर ड्राय डेच्या मध्यरात्री दारू विक्री केल्याप्रकरणी बॉलर पबच्या मॅनेजर विरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल केला गेला आहे अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.




