पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, पुणे महानगर पालिकेतील सहाय्यक आयुक्तालाच लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने महापालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
एका ३४ वर्षीय तक्रारदाराने तक्रार केली होती. १) कोथरूड-बावधान क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे,२) अनंत रामभाऊ ठोक, वय ५२ वर्षे, कनिष्ठ अभियंता,३) दत्तात्रय मुरलीधर किंडरे, वय ४७ वर्षे, शिपाई यांच्या विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू आहे.
यातील तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी कोथरूड येथील ड्रेनेज लाईन व काँक्रीटीकरणाच्या कामाचे बील मिळणेकरीता लोकसेवक सचिन तामखेडे यांना भेटले असता त्यांनी २५ हजार रूपयांची लाचेची मागणी केल्याची तक्रार दिली होती.
तक्रारीची पडताळणी केली असता तक्रारदार यांनी केलेल्या कामाचे बील मंजूर करून देण्याकरीता सचिन तामखेडे यानी तडजोडीअंती १५ हजार रूपये लाचेची मागणी केली.
त्या लाच मागणीस अनंत ठोक यानी सहाय्य केले.आज रोजी सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार हे सचिन तामखेडे यांना भेटले असता त्यांनी अनंत ठोक याचेकडे लाच रक्कम देण्यास सांगितले
व ठोक यानी कार्यालयातील शिपाई दत्तात्रय किंडरे याचेकडे देण्यास सांगीतले व किंडरे यानी १५ हजार रूपयांची लाच रक्कम स्वीकारल्यावर त्या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक भारत साळुखे हे तपास करत आहेत.