पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचा अजब प्रताप समोर आला आहे. १५ लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.दौंड तालुक्यातील वरवंड येथील सुरेश गांधी या ज्येष्ठ नागरिकाचा वन विभागाच्या हद्दीत गळा दाबून खून करतानाचा व्हिडीओ आपल्याकडे आहे. हे प्रकरण कोणाला न सांगण्यासाठी मला १५ लाख रुपये द्या,अशी मागणी करणाऱ्या पोलिसावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर गोविंद शिंदे रा. वरवंड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. सागर शिंदे हा विश्रामबाग पोलीस ठाण्यातील कर्मचारी आहे.तो मागील सहा महिन्यापासून गैरहजर आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शिंदे याने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.मात्र, न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळून लावला आहे.सुरेश गांधी खून प्रकरणात पोलिसाने खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली असून या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २७ मार्च २०२२ रोजी वरवंड येथील राहुल भंडारी यांचे सासरे सुरेश गांधी यांचा गळा आवळून वन विभागाच्या जागेत खून करण्यात आला होता.हा खून करतानाचा व्हिडीओ माझ्याकडे असून या प्रकरणात तुमच्या घरातील सर्वांना अडकवू शकतो. असे सांगत सागर शिंदे याने १५ लाखांची मागणी राकेश भंडारी याच्याकडे केली.
दरम्यान, सागर शिंदे याने आरोपी राकेश भंडारी यांच्याकडून यापूर्वी ८ लाख रुपये घेतले आहेत.त्यामुळे राकेश भंडारी यांनी यवत पोलीस ठाण्यात सागर शिंदे याच्या विरोधात तक्रार दिली.या तक्रारीवरून यवत पोलिसांनी सागर शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे करीत आहेत.