पुणे : “नियम फक्त कागदावर! करार रद्द झालून एक वर्ष उलटले, तरी कोंढव्याचा अबु हनीफा हॉल फ्युचर फाउंडेशनकडेच; लग्न समारंभ चालूच”

0
Spread the love

नगरसेवक-आमदारांचा दबाव, अधिकारी हतबल; लग्न समारंभ सुरूच

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी

कोंढवा (पुणे) : कोंढवा खुर्द (सर्वे नंबर ४६) येथील अबु हनीफा बहुद्देशीय संस्कृती हॉलचा करारनामा पुणे महानगरपालिकेने एक वर्षापूर्वी रद्द केला असतानाही हॉल अद्याप फ्युचर फाउंडेशनकडेच आहे. कराराचे नियम धुडकावून लग्न समारंभ, साखरपुडा, रिसेप्शनसारखे खाजगी कार्यक्रम घेण्याचे प्रकार सुरूच आहेत. आमदार आणि नगरसेवकांच्या दबावामुळे महापालिका अधिकारी हतबल झाल्याची माहिती समोर आली आहे.

माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या प्रयत्नातून अस्तित्वात आलेल्या या हॉलला पुणे महानगरपालिकेने २६ जून २०२३ रोजी फ्युचर फाउंडेशनला ५ वर्षांसाठी (२६ जून २०२३ ते २६ जून २०२८) करारनाम्यावर दिले होते. करारात स्पष्ट नमूद करण्यात आले होते की, हॉल फक्त सामाजिक उपक्रमांसाठी वापरता येईल. खाजगी कार्यक्रम केल्यास करारनामा रद्द करण्यात येईल.

मात्र फ्युचर फाउंडेशनने या अटींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. संस्थेने हॉल लग्न, साखरपुडा आणि इतर खाजगी कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्यास सुरुवात केली. स्थानिक कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी २८ एप्रिल २०२५ रोजी करारनामा रद्द केला.

रद्द झालूनही ताबा कायम

करार रद्द झाल्यानंतर एक वर्ष उलटले तरी हॉलचा ताबा फ्युचर फाउंडेशनकडेच आहे. समाज विकास विभागाने तीन वेळा हॉल सील करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक वेळी सील तोडण्यात आल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले. सील तोडल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

दबावाची शक्यता

एक वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “आमदार आणि नगरसेवकांकडून सातत्याने दबाव टाकला जात आहे. त्यामुळे कारवाई करणे कठीण झाले आहे.” कोंढवा पोलिस ठाण्यात हॉल सील करण्यासाठी बंदोबस्त मागितला असताना पोलिसांनी नकार दिला. पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांकडे पत्रव्यवहार करण्याचा सल्ला देण्यात आला.

नागरिकांचा प्रश्न : स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते आता प्रश्न उपस्थित करत आहेत की, करार रद्द झाल्यानंतरही हॉल का परत घेतला जात नाही?सील तीन वेळा तोडले तरी गुन्हा का दाखल झाला नाही? पोलिस बंदोबस्त का देण्यात आला नाही?
पुणे सिटी टाईम्स या प्रकरणाची अधिक माहिती आणि संबंधित आमदार-नगरसेवकांची नावे लवकरच जनतेसमोर आणणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here