पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे महानगर पालिकेतील कर्मचाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने पालिकेत खळबळ उडाली आहे. गाडीवर काम देण्यासाठी ४ हजार रुपये लाच घेताना पुणे मनपा, व्हेईकल डेपो, गुलटेकडी येथील वाहन वाटप विभागातील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. पांडुरंग साधू लोणकर वय ५७ असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई मंगळवारी स्वारगेट येथील शंकर शेठ रोडवरील क्वालिटी स्पेशल चहा टपरी समोर केली आहे.
पथकाने १६ आणि २० ऑगस्ट रोजी पडताळणी करुन मंगळवारी सापळा कारवाई केली. तक्रारदार हे खाजगी कंत्राटी वाहन चालक असून पांडुरंग लोणकर यांनी तक्रारदार यांना मनपाच्या गाडीवर दररोज काम नेमूण देण्याकरिता ४ हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीच्या कार्यालयात तक्रार दिली.त्यानुसार पथकाने पडताळणी केली असता पांडुरंग लोणकर यांनी मनपाच्या गाडीवर दररोज काम देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
मंगळवारी स्वारगेट शंकर शेठ रोडवरील चहाच्या टपरीसमोर सापळ लावण्यात आला होता. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना पांडुरंग लोणकर यांना पकडण्यात आले. लोणकर यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत दाखल करण्यात आला आहे.