पुणे शहर वाहतूक विभागाकडून सुरक्षेच्या नावाखाली नागरिकांची अडवणूक; ही खरंच सुरक्षा आहे का भीती?

0
Spread the love

लेखी आदेश नसताना देखील मनमानी कारभार.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान

पुणे शहर वाहतूक विभागाचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे वरिष्ठांचे आदेश नसताना देखील नागरिकांची शुल्क शुल्क कारणाने अडवणूक होत असल्याने नागरिकांमध्ये व वाहतूक पोलिसांमध्ये खटके उडत असून वरिष्ठ मात्र याचा मजा घेत बसले आहेत. पुणे शहर वाहतूक शाखा ( पोलिस उपायुक्त कार्यालय येरवडा) येथे कामानिमित्ताने गेलेल्या नागरिकांचे थेट मोबाईल फोन बाहेर ठेवूनच अधिका-यांना भेटायला पाठवले जात आहे.

याचे कारण नागरिकांनी विचारल्यावर वाहतूक पोलिस हुज्जत घालत असल्याचे “पुणे सिटी टाईम्सच्या” निदर्शनास आल्याने वाहतूक शाखा पुणे शहर कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मोबाईल फोन बाहेर ठेवणे संदर्भात पोलिस आयुक्त व पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा यांनी काढलेल्या कार्यालयीन आदेशाची प्रत माहिती अधिकारात माहिती मागितली असता,

सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूक शाखा तथा जनमाहिती अधिकारी व्यंकटेश देशपांडे यांनी दिलेल्या उत्तरात नमूद केले की,या शासकीय कार्यालयात व वरिष्ठांना भेटण्याकरिता आलेले नागरिक सदर कालावधी मध्ये त्यांचे मोबाईल फोनवर बोलतात त्यामुळे शासकीय कामाकाजा मध्ये व्यत्यय येत असतो. त्याकरिता त्यांचे मोबाईल फोन वाहतुक शाखा मुख्य कार्यालय येथील काउंटरवर सुरक्षितरित्या ठेवण्यात येतात नागरिकांना त्यांचे मोबाईल मधुन काही माहिती सादर करावयाची असल्यास त्यांना त्यांचे मोबाईल घेवुन जाण्यास परवानगी दिली जाते.सदर आदेश लेखी स्वरुपात नसुन कार्यालयीन कामाकाजा संदर्भातील तसेच सुरक्षिते संदर्भातील आहेत.

असे उत्तरात म्हटले असले तरी पोलिस आयुक्तांचे लेखी आदेश नसताना वाहतूक शाखा पुणे शहर स्वतःचीच मनमानी का करत आहे? एखाद्या नागरिकाचे मोबाईल गहाळ झाल्यास किंवा मोबाईल फोन मधील डाटाच चोरीला गेल्यास याची जबाबदारी कोण घेणार?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अधिक माहितीसाठी पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधींनी समक्ष जाऊन पाहणी केली असता काही वाहतूक पोलिसांनी याला दुजोरा दिला असून ते म्हणाले की कोणीही उटसुट व्हिडिओ काढतात आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करतात त्याचा मनस्ताप होतो. परंतु अधिक माहिती घेतली असता काही कर्मचा-यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की काही आतील कर्मचारी दुसऱ्या डिवीजन मधील कर्मचा-यांना आर्थिक फायदयासाठी पिळवणूक करत होते. तर त्यांना तत्कालीनचा देखील पाठिंबा होता.

म्हणजेच याचा अर्थ सुरक्षिततेच्या नावाखाली आतील गैरप्रकार बाहेर पडू नये यासाठीच हा सर्व खटाटोप चालू आहे का? मोबाईल फोन बाहेर ठेवल्याने कसली आली सुरक्षा? सुरक्षिततेच्या नावाखाली तर भिती लपवली तर जात नाही ना? असा प्रश्न आज पुणेकरांना पडला आहे. पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मोबाईल फोन बाहेर ठेवण्याचे उपदेश दिले जात नाही तर, मग वाहतूक शाखेत असे नियम का लावले जात आहे. ज्याला कर नाही तर त्याला डर का? असा प्रश्न आज उपस्थित होते आहे. या बद्दल पोलिस आयुक्तांनीच लक्ष घालण्याची पुणेकरांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here