पुणे शहरातील पद पथावरील “फेरीवाला प्रमाणपत्र” मध्ये आर्थिक देवाणघेवाण, प्रमाणपत्र विकत देणाऱ्या नोंदणीकृत पथ विक्रेत्याचे प्रमाणपत्र कायमस्वरूपी रद्द होणार. पुणे महानगर पालिका.

0
Spread the love

व्यावसायिकाचे नाव मनपा प्रशासनाकडून काळ्या यादीत टाकले जाणार.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

पद पथावरील विक्रेत्यांनी स्वताला मिळालेले नोंदणीकृत प्रमाणपत्र इतर लोकांना विकत असल्याचे पुणे महानगर पालिकेच्या निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील रस्ता पद-पथांवरील नोंदणीकृत काही पथ विक्रेते त्यांची प्रमाणपत्रे इतर पथ विक्रेत्यांना व नागरिकांना अनधिकृतपणे आर्थिक व्यवहार करून विकत असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपासणीत आढळून आले आहे.

त्या अनुषंगाने शहरातील पथ विक्रेत्यांना अथवा नागरिकांना पुणे महानगरपालिकेकडून कळविण्यात आले आहे की, केंद्र शासनाच्या “पथ विक्रेता अधिनियम, २०१४ मधील तरतुदीनुसार पुणे मनपाकडील नोंदणीकृत झालेल्या कोणत्याही पथ विक्रेत्यास देण्यात आलेले “फेरीवाला प्रमाणपत्र” हे इतर पथ विक्रेत्यांना अथवा नागरिकांना कोणत्याही मार्गाने विक्री करण्याचा अथवा अनधिकृतपणे व्यवसाय करणेस देण्याचा अधिकार दिलेला नाही.

असे असताना एखाद्या नोंदणीकृत पथ विक्रेत्याने अशा प्रकारचा गैर मार्गाने आर्थिक देवान-घेवाण करून प्रमाणपत्र विकत देण्याचा इतर व्यक्तींशी गैर व्यवहार केल्यास त्यास पुणे महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. अशा गैर मार्गाने मिळविलेल्या फेरीवाला प्रमाणपत्रावर कोणालाही पद-पथांवर व्यवसाय करता येणार नाही.

तसेच असे प्रमाणपत्र विकत देणाऱ्या नोंदणीकृत पथ विक्रेत्याचे प्रमाणपत्र कायमस्वरूपी रद्द करण्यात येऊन सदर व्यावसायिकाचे नाव मनपा प्रशासनाकडून काळ्या यादीत समाविष्ट करण्यात येईल. याची संबंधित नागरिक व नोंदणीकृत व्यावसायिक यांनी नोंद घेण्याचे आवाहन उप आयुक्त, माधव जगताप अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग, पुणे महानगरपालिका यांचेकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here