पुणे सिटी टाईम्स (PCT) प्रतिनिधी.
“आज इसका मर्डर करता हू” म्हणत डोक्यात लोखंडी रॉडने मारल्याने ,कोंढवा पोलिस ठाण्यात ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हकीकत अशी की, क्लासवरुन घरी जाणाऱ्या मुलाला मारहाण करणाऱ्या तरुणाला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला तिघांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार मंगळवारी २७ फेब्रुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोंढवा परिसरातील समतानगर येथील सार्वजनिक शौचालयाच्या जवळ घडला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दिलावर करिम सय्यद वय-४१ रा.आर युफोरिया सोसायटी, कोंढवा बुद्रुक यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन झैद आसिफ सय्यद वय-१८, सैफ आसिफ सय्यद वय-२५, आसिफ सय्यद वय-५० सर्व रा. आगरा हॉटेल मागे, कौसरबाग, यांच्या विरोधात ३०७,३२३,५०४,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा व त्याचा मित्र क्लासवरुन दुचाकीवरुन घरी जात होते. त्यावेळी आरोपी झैद याने कौसरबाग येथील एका हॉटेल जवळ अडवले.त्याने फिर्यादी यांच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यावेळी मुलाने वडील फिर्यादी यांना फोन करुन बोलावून घेतले. फिर्यादी त्या ठिकाणी जाऊन झैद याला समजावून सांगत भांडण सोडवत होते. त्यावेळी तो आगरा हॉटेलच्या बेसमेंटमध्ये पळून गेल्याने फिर्यादी व त्यांचा मुलगा त्याला पकडण्यासाठी गेले.त्यावेळी आरोपी आसिफ याने फिर्यादी यांच्या तोंडावर पंच मारुन जखमी केले.
आसिफचा मुलगा सैफ याने ‘आज इसका मर्डर करता हूं’ असे म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड दिलावर शेख यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या मुलाला देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे करीत आहे.