मैलापाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांनी चालायचे तरी कोठून?
नगरसेविकांचे दुर्लक्ष, इसहाक पानसरे आंदोलनाच्या भुमिकेत.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी, कोंढव्यात लोक संख्या वाढली असली तरी आज काही ठिकाणी मैलापाणी वाहून नेणाऱ्या गटारीतील लाईन जुन्याच असल्याचे सांगितले जात आहे.
कोंढवा मध्ये कुठं ना कुठं रोज मैलापाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोंढवा येथील तेजस हॉल ते मिठानगर बस स्थानकापर्यंत गटारीतील मैलापाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांनी चालायचे तरी कोठून असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.
कामावर जाणार नागरिक, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना सर्वाधिक फटका बसत आहे. त्यात एखाद्या वाहन चालकाने गाडी सुसाट वेगाने नेली तर सदरील गटारीतील मैलापाणी रस्त्यांवरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडत आहे.
सारखंच मैलापाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वानवडी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी झोपा काढतात की काय? असा प्रश्न देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे वाहतूकीमुळे कोंढव्यातील रहिवासी वैतागले असून त्यात मैलापाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिक आणखीन संतापले आहेत. पुणे महानगर पालिकेने व स्थानिक नगरसेवकांनी त्वरित लक्ष न दिल्यास सामाजिक कार्यकर्ते इसहाक पानसरे आंदोलन करणार आहेत.