जागा ब्रह्मा बिल्डरची आणि रुबाब दुसऱ्याचाच.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
कोंढवा कौसरबाग येथील ब्रह्माकाउंटी जवळील सर्वे क्रमांक ३१ या मिळकतीवर काही अज्ञात त्रयस्थांनी अनधिकृतरित्या शिरकाव करून जागा बळकावण्याचा प्रकार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. सदर जागा ब्रह्मा बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीची असून, या मिळकतीसंबंधी सर्व वैध कागदपत्रे, सातबारा आणि अन्य दस्तऐवज कंपनीकडे उपलब्ध असल्याचे ब्रह्मा बिल्डकॉनच्या वकीलांनी सांगितले.
अधिक माहिती अशी की, काही गावगुंडांनी मिळकतीवर जबरदस्तीने ताबा मिळवून तेथे धारदार शस्त्रे, कोयते, चाकू इत्यादी ठेवले. यामुळे जागेवर असलेल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करून जखमी केल्याची माहिती वकिलांनी दिली. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली असली तरी अद्याप पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी तक्रार ब्रह्मा बिल्डकॉनच्या वकिलांनी मीडियासमोर व्यक्त केली.
तसेच मिळकतीवर ताबा मिळवण्याच्या उद्देशाने त्रयस्थांनी जमिनीचे कोणतेही अधिकृत कागदपत्र सादर केले नसून उलट तेथील संरचनेचे नुकसान केले आहे. या घटनेमुळे आमच्या पक्षकारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे वकिलांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीही त्यांच्या कामकाजावर प्रतिकूल परिणाम होईल असे प्रकार घडले होते. त्या कारणाने त्या काळात जागेवर कोणी उपस्थित नसल्याचा गैर फायदा घेऊन हा बेकायदेशीर शिरकाव केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करून सदर मिळकतीवरील अनधिकृत कब्जा दूर करण्यात यावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी विनंती ब्रह्मा बिल्डकॉनच्या वकिलांनी प्रशासन आणि पोलिसांकडे केली आहे.
ह्या प्रकरण बाबतीत पत्रकारांनी पोलीस निरीक्षक गुन्हे जगताप यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. आणि त्या ठिकाणाहून निघून गेले.




