पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील एका क्लब मध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा प्रकार समोर आला असून मुंढवा पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. देशात स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘प्री इंडिपेंडेंस डे’ कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
सदरील घटना पुण्यातील कोरेगाव पार्क येथील फ्रिक सुपर क्लब येथे घडली. याबाबत मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर फ्रिक सुपर क्लब येथे ‘प्री इंडिपेंडेंस डे’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुझिकल कॉन्सर्ट दरम्यान एका गायकानं मंचावर गाणं सादर करत असताना हातातील देशाचा तिरंगा प्रेक्षकांमध्ये भिरकावून राष्ट्रध्वजाचा अवमान केला. याबाबत अॅड आशुतोष भोसले यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.