कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात साक्ष नोंदवण्यासाठी वारंवार बोलावूनही न्यायालयात हजर न राहिलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाश अटक करुन न्यायालयात हजर करण्याचे आदेश.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

साक्ष देण्यासाठी कोर्टात हजर न राहणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना अटक करून कोर्टात हजर करण्याचे आदेश न्यायालयाने काढल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. हकीकत अशी की,कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात २०१३ मध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात साक्ष नोंदवण्यासाठी वारंवार बोलावूनही न्यायालयात हजर न राहिल्याने तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. डी. कांबळे यांना अटक करुन न्यायालयात हजर करा, असे आदेश शिवाजीनगर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एस. पाटील यांनी दिले आहेत.

२० मे २०१३ रोजी हानिफ गुलामअली सोमजी (रा. बोट क्लब रोड) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार शिवाजी कांतीलाल शिंदे, साईनाथ निवृत्ती सातव, सोमनाथ काळूराम सातव, विष्णू बाजीराव सातव, ज्ञानेश्वर किसन सातव, निळाराम शितकल (सर्व रा. केसनंद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारहाण करून प्रत्येकी रूपये वीस लाख रुपयांची खंडणी मागणे, फिर्यादी यांच्या कार्यालयात प्रवेश करणे, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सोमजी यांनी फिर्यादीत म्हटले होते.

या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी तपास करून २४ सप्टेंबर २०१३ रोजी न्यायालयात आरोपत्र दाखल केले होते.कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या खटल्याची सुनावणी २७ जानेवारी २०१७ रोजी सुरु झाली. आरोपींच्या वतीने अॅड. मिलिंद पवार. अॅड. आकाश देशमुख हे खटल्याचे काम पाहात आहेत. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने साक्षीदारांची साक्ष नोंदवली. परंतु २०१९ पासून या खटल्याचे अधिकारी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. डी. काबळे यांची साक्ष नोंदवण्यात आली नाही.

यासंदर्भात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याने न्यायालयात अहवाल सादर केला. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.डी. कांबळे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता.परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच त्यांच्याविरुद्ध पकड वॉरंट बजाविण्यात आले होते.हे पकड वॉरंट त्यांच्या मोबाईलवर पाठवले होते. परंतु त्यालाही कांबळे यांनी प्रतिसाद दिला नाही, असे पोलीस कर्मचाऱ्याने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले होते.

संबंधित अहवाल न्यायालयात सादर झाल्यानंतर सरकारी वकिलांनी न्यायालयात अर्ज केला.कांबळे यांना पकडून आणण्यासाठी पकड वॉरंट काढण्यासाठी विनंती केली. न्यायालयाने पोलिसांची विनंती मान्य केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एस. पाटील यांनी जामीनपात्र वॉरंट काढले.या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here