पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी
पुणे शहरातील उपनगर कोंढवा भागात एका बेकायदेशीर बांधकामांचा बादशाहने धक्कादायक कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. कोंढवा खुर्द, साईबाबा नगर, गल्ली क्र. २ मध्ये केवळ २ गुंठ्याच्या छोट्या जागेत ९ मजली भव्य इमारत बेकायदेशीरपणे बांधून नवनाथ माने याने इतिहास रचला आहे.

बेकायदेशीर बांधकामांचा बेताब बादशाह म्हटलं तरी वागवे ठरणार नाही. बांधकाम करताना त्याने बेकायदेशीररित्या गौण खनिज उत्खनन करून लाखो रुपयांचा चुना जिल्हाधिकाऱ्यांना लावला. एवढ्यावर न थांबता त्याने पुणे महानगरपालिकेचा महसूल बुडवून शासनाच्या तिजोरीवर दरोडा घातला आहे.
कोंढवा पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध सर्वाधिक तक्रारी आणि गुन्हे दाखल असतानाही तो आजही बिनधास्तपणे रोज कुठे ना कुठे जमीन खरेदी करताना आणि बेकायदेशीर बांधकामे करताना दिसत आहे. हे सर्व पालिका, महसूल आणि पोलिस यंत्रणेला दिसत नसले तरी नागरिकांच्या डोळ्यांच्या कॅमेऱ्यात कैद होत आहे.
झटपट सहा-आठ महिन्यांत टोलेजंग इमारत उभी करून कोट्यवधी रुपये कमावून, लोकांचे जीव धोक्यात घालून तो सुखाने जगत आहे. एखाद्या वेळी ही बेकायदेशीर इमारत खचली किंवा पडली तरी तो फायद्यातच राहणार, कारण ७/१२ उताऱ्यावर ज्याच्या नावावर जमीन आहे, तोच शेवटपर्यंत मालक राहणार. बेकायदेशीर बांधकाम कोसळल्यानंतर मात्र नागरिकांच्या हाती भोपळाच राहणार, कारण कुठल्याही नोंदणीअभावी त्यांना न्याय मिळणे कठीण होईल.
मागील बातमी; कोंढव्यात नवनाथ माने बिल्डरचा खुला आतंक! बेकायदेशीर ८-९ मजली ‘टोलेजंग’ ताजमहाल
९ मजली ही टोलेजंग इमारत उभी करताना पालिका यापूर्वीप्रमाणे यावेळीही झोपेचे सोंग घेऊन बसणार का? कारण त्यांचा नातेवाईक त्या इमारतीत राहत नाही ना? “आपून ने बनाई मलाई, सबको बाट के खिलाई” हे सूत्र सध्या जोरात सुरू आहे.


