पालिकेच्या कर्मचाऱ्याने कोंढवा पोलिस ठाण्यात दिली फिर्याद.
एकाच बिल्डरचे ७ ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे, आवर घालणार तरी कोण?
पुणे सिटी टाईम्स (PCT) प्रतिनिधी.
कोंढवा भाग बघता बघता बकाल होत चालला आहे. जिथे तिथे बेकायदेशीर बांधकामांना उत आले आहे. झटपट पैसे मिळत असल्याने १ वर्षभराच्या आत ७ ते ८ मजली इमारत ठोकून मोकळे होताना दिसत आहे. कोंढव्याची पुर्णपणे वाट लागून गेलेली आहे. आता हे कुठेतरी थांबले पाहिजे. बेकायदेशीर इमारती उभ्या तर राहत आहेत. परंतु एका दिवशी इमारत कोसळली तर याची जबाबदारी कोणी घ्यायला तर नाही.
पुणे महानगर पालिकेतील अधिकारी राजेश खाडे व अमोल पुंडे आता ॲक्शन मोडवर आले आहेत. कोंढवा मध्ये बेकायदेशीर बांधकामांचा ” खात्मा “ करण्यास सुरुवात झाली आहे. एका धनाजी बिल्डरचे ७ ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे सुरू असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आल्याने त्या धनाजी बिल्डरवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवनाथ माने रा. भाग्योदय नगर कोंढवा खुर्द, असे गुन्हा दाखल झालेल्या धनाजी बिल्डराचे नाव आहे. या संदर्भात अमोल पुंडे यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम १९६६ कलम ४३.५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नवनाथ माने यांचे १) सर्वे नं ५१ भाग्योदय नगर ले. नं. ३२ अलफलाह मस्जिद शेजारी, २) सर्वे नं ४६ मलिक नगर, ३) सर्वे नं ५१ शिवनेरी, ४) सर्वे नं ५० भाग्योदय नगर ( माजी नगरसेविका परवीन फिरोज शेख) यांच्या कार्यालयासमोर), ५) सर्वे नं ४८ ले. नं १ साईबाबा नगर, ६) सर्वे नं ५१/२ ब मिठानगर, ७) सर्वे नं ४९ कोंढवा खुर्द, असे ७ ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
तर कोंढवा बुद्रुक पठाण चौकात देखील बांधकाम नवनाथ माने यांचे सुरू आहेत.एवढया मोठ्या प्रमाणावर बांधकाम चालू असताना ते बांधकामे कायमचीच थांबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.