पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
दुचाकीस्वाराला पाठीमागून धक्का दिल्याने त्याचा फोटो काढत असताना कार चालकाने कार अंगावर घातली आणि मग दुचाकीस्वार कारच्या बोनेटवर पडल्याने त्याला ५०० मिटर पर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. लोकांनी बोंबाबोंब केल्यावर कारचालकाने गाडी थांबविली. वानवडी पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे.
राजीव कृष्णकुमार बर्मन (वय ६०, रा. सॅकर्ट हर्ट टाऊन, वानवडी) असे या कारचालकाचे नाव आहे. याबाबत अभिजित येडुबा गोलाईत (वय ३०, रा. हेवन पार्क, आझादनगर, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सोलापूर रोडवरील भैरोबानाला चौक येथे ८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवरुन घरी जात असताना पाठीमागून आलेल्या मारुती अर्टिगा कारने त्यांना मागून धडक दिली.
त्यात दुचाकीचे फुटरेसचे नुकसान झाले यावेळी फिर्यादी यांनी कारच्या पुढे उभे राहून चालकाला बाहेर ये सांगत होते. ते कारचा फोटो घेत होते.
तेव्हा कारचालकाने कार पुढे आणली. त्यामुळे तिची धडक फिर्यादी यांना बसली व ते कारच्या बोनेटवर आपटले. कारचालकाने त्याच स्थितीत कार पुढे नेण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून आजू बाजूचे लोक आरडा ओरडा करु लागले. तरी कारचालक न थांबता तसाच पुढे जात होता. जवळपास ५०० मीटर कार पुढे नेल्यानंतर पुढे काही वाहने आडवी आल्याने त्याने कार थांबविली. तेव्हा फिर्यादीची सुटका झाली.
या घटनेची माहिती समजताच सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
वानवडी पोलिसांनी कार चालकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून राजीव बर्मन याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे पुढील तपास करीत आहे.