पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
कोथरूड मध्ये चाललंय तरी काय? दोन दिवसांपूर्वी एका आयटी इंजिनिअरला मारहाण झाली होती. तर शनिवारी काही टोळक्याने लहान मुलांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच, रविवारी रात्री एका २२ वर्षीय तरूणावर सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे.
कोथरूडच्या शास्त्रीनगर येथील दत्त मंदिराजवळ रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. गौरव अविनाश थोरात वय २२, रा. मराठा महासंघ सोसायटी शास्त्रीनगर कोथरूड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश भालेराव वय २७, सोहेल सय्यद वय २४, राकेश सावंत वय २४, साहिल वाकडे वय २५ बंड्या नागटिळक वय १८, लखन शिरोळे वय २७ अनिकेत उमाप वय २२ यांच्यासह आणखी काही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर वसंत कसबे वय ४७ यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री गौरव थोरात हा शास्त्रीनगर येथील दत्त मंदिराजवळ मित्रांसोबत बसला होता. यावेळी त्या ठिकाणी आलेला आरोपी सोहेल सय्यद यांनी जुन्या भांडण्याच्या कारणावरून गौरव याच्या दिशेने गोळी झाडली. मात्र गौरवला गोळी लागली नाही.
त्यानंतर इतर आरोपींनी तलवार आणि कोयत्याने गौरव याच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये गौरव याच्या मान डोके पोटावर आणि पायावर वार केले होते. यामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या गौरवचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.