पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
गेल्या ३ महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला पोलिस अटक केली आहे.कोंढवा येथील महिलेची जागा बळकविणाऱ्या सराईत गुन्हेगार टिपू पठाण याच्या टोळीतील फरार गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने तेलंगणातील हैदराबाद येथून जेरबंद केले आहे.
फैयाज गफार बागवान वय २८, रा. गल्ली नं १७ खाजा मंजिल गल्ली, सय्यदनगर, हडपसर असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
मासे विक्री करणाऱ्या महिलेचा हडपसर येथील १२९० स्क्वेअर फुट मोकळा प्लॉटवर टिपू पठाण, त्याचा भाऊ इजाज पठाण यांनी बेकायदेशीर जमाव जमवून ताबा घेतला होता. महिलेने या जागेवर उभारलेले शेड पाडून टिपू पठाण याने आपला भाऊ इजाज पठाण याच्या मालकीची जागा असल्याचे सांगून स्वतःचा बोर्ड लावला होता. ही जागा परत हवी असेल तर वीस लाख रुपयांची मागणी केली होती.
काळेपडळ पोलिसांनी टिपू पठाण, त्याचा भाऊ इजाज पठाण यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. त्याच्या टोळीतील इतर गुन्हेगारांची नावे निष्पन्न केली आहेत.
या फरारी आरोपींचा गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत होते. पोलीस अंमलदार नासेर देशमुख व राहुल ढमढेरे यांना फैयाज बागवान हा आरोपी हैदराबाद येथील हाफीस पेठमधील प्रेमनगरमध्ये रहात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने मियापूर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीने फैयाज बागवान याला ताब्यात घेतले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खरात, पोलीस अंमलदार नासेर देशमुख, शहाजी काळे, राहुल ढमढेरे यांनी केली आहे.




