पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पोलिस नागरिकांच्या रक्षणासाठी असताना तेच कधी भक्षक झाले तर? होय असाच एक प्रकार समोर आल्याने पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. नागरिकांना मदतीसाठी पोहचता यावे, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात मोबाईल व्हॅन देण्यात आली आहे. त्यांनी हद्दीमध्ये गस्त घालून गुन्हे प्रतिबंध करावे. परंतु, या मोबाईल व्हॅनवर नेमलेले पोलीसच रात्री लोकांना अटक करण्याची धमकी देऊन, लोकांच्या तक्रारी असल्याचे खोट सांगून लुबाडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्याने पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस अंमलदारांना निलंबित केले आहे.
गणेश तात्यासाहेब देसाई आणि योगेश नारायण सुतार अशी या पोलीस अंमलदारांची नावे आहेत.
पोलीस अंमलदार गणेश देसाई याला १७ जूनला रात्रपाळीसाठी मोबाईल व्हॅनवर वाहनचालक म्हणून तर, पोलीस अंमलदार योगेश सुतार याला बालगंधर्व बीट मार्शल म्हणून नेमणूक देण्यात आली होती.
डेक्कन पोलीस ठाण्यात एका तक्रार अर्ज आला होता. त्यात ते व त्यांची मैत्रीण हे लॉ कॉलेज रोडवरील दामले पथ येथे कार पार्क करुन रात्री थांबले होते. त्यावेळी दोन पोलीस अंमलदार आले व त्यांनी या भागातून एक तक्रार आली असून पैसे द्या असे सांगून २० हजार रुपये मागितले.
एवढे पैसे का?, असे विचारले असता त्यांना चौकीला चला असे बोलले. पोलीस, चौकी या गोष्टीचे दडपण येऊन चौकीला नको, असे म्हणून पैसे देण्याचे कबुल केले. त्यानंतर गणेश देसाई याच्या दुचाकीवर मागे बसून कमला नेहरु पार्क येथील एटीएम मधून २० हजार रुपये काढून दिले होते.
कायद्याच्या उल्लंघनासाठी विचारपुस करण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाणे आवश्यक असताना कोणतीही कार्यवाही न करता त्यांना सोडुन देऊन कर्तव्यात कसुरी करुन बेजबाबदारपणाचे वर्तन करुन पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याने त्या दोघा वसुली बहाद्दरांना पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी निलंबित केले आहे. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.