पुणे : जप्त केलेल्या चारचाकी व दुचाकी तसेच अनामत रक्कम न भरलेल्या वाहनांची विक्री केल्याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ -५ आर राजा यांनी सोमवारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल दयानंद दशरथ गायकवाड, पोलीस नाईक संतोष शंकर अंदुरे, पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम सदाशिव पांडे, पोलीस कॉन्स्टेबल राजेश मनोज दराडे अशी निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला आणि कायदेशीर कर्तव्यावर असताना बेकायदेशीर कर्तव्ये व कृत्ये केली. गुन्ह्यातून जप्त केलेली दुचाकी व चारचाकी वाहने तसेच लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहने विना पैसे जमा करून बिनशेती व स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी विकण्यात आली होती. आरोपींकडून वेळोवेळी नुकसानभरपाई म्हणून ४ लाख ६० हजार रुपये स्वीकारल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच पोलिस कर्मचारी परवानगीशिवाय ड्युटीवर गैरहजर होते.
पोलीस कर्मचाऱ्यांचे वर्तन विभागाच्या शिस्तीत नसून अत्यंत गंभीर, बेजबाबदार, असभ्य व अनुशासनहीन व गुन्हेगारी स्वरूपाचे असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. निलंबन कालावधीत तुम्हाला मुख्यालय सोडायचे असल्यास, तुम्ही पोलिस उपायुक्त, मुख्यालय, पुणे शहर यांची पूर्वपरवानगी घ्यावी. तसेच, निलंबन कालावधीत राखीव पोलिस निरीक्षकांना पोलिस मुख्यालयात हजर राहणे बंधनकारक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.