पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
लाच मागणे हे गुन्हा असतानाही लाच मागणे एका महिला तलाठ्यास चांगलेच महागात पडले आहे.खरेदी केलेल्या जमिनीची सातबारा उता-यावर नोंद करणेसाठी १५०० रूपयांची लाच मागणी करून लाच स्वीकारले प्रकरणी आरोपी लोकसेवक सीमा सुभाष कांबळे, तलाठी, सजा सारोळा, ता. भोर, जि. पुणे यांचेवर १६ नोव्हेंबर २०१५ रोजी राजगड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर नं. ९४/२०१५ लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमा खाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे युनिटचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अरूण घोडके यांनी करून विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे २२ सप्टेंबर २०२२ रोजी विशेष न्यायाधीश पी.पी.जाधव, विशेष न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी सदर खटल्यामध्ये न्यायनिर्णय देवून त्यामध्ये आरोपी लोकसेवक सीमा सुभाष कांबळे, तलाठी यांना भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायदा कलम ७,१३ अन्वये ५ वर्षे सश्रम कारावास व १ लाख रूपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
सरकारतर्फे सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी अभियोक्ता प्रेमकुमार अगरवाल व चंद्रकिरण साळवी यांनी पाहिले. त्यांना अभियोग कामकाजा मध्ये पैरवी पोलीस नाईक जगदिश कस्तुरे व पोलीस हवालदार अतुल फरांदे यांनी मदत केली.लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.