पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुण्यातील मध्यवर्ती भागात अचानक गोळीबार करून युवकाला ठार मारल्याने खळबळ उडाली आहे.सदरील घटना पुण्यातील घोरपडे पेठेत घडली आहे. अनिल रामदेव साहू वय – ३५ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एका अनोळखी व्यक्तीवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत व्यक्तीचा भाऊ घुरणकुमार हरिदेव साहु वय २४ रा. श्रीमंत सुवर्णभारत मित्र मंडळाजवळ, घोरपडी पेठ पुणे मुळ रा. वाजीतपुर, जि. दरभंगा, बिहार.यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहू कुटुंबीय मूळचे बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यातील आहेत. मात्र,कामानिमित्त ते पुण्यात आले आणि घोरपडे पेठेत राहू लागले होते. घोरपडे पेठेतील श्रीकृष्ण हाईट्स या इमारतीत ते राहत होते. रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास गाढ झोपेत असताना अचानक दरवाजा वाजला. फिर्यादी घुरणकुमार जागे झाले. त्यांनी दरवाजा उघडला असता समोर दाढीमिशा असलेला, अंगाने जाड अनोळखी व्यक्ती उभा होता.
अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांना ‘तेरा भाई किधर है, उसको बुला’ असे सांगितले.त्यानंतर फिर्यादी यांनी किचनमध्ये हेडफोन लावून बसलेल्या अनिल साहू यांना बाहेर आलेल्या व्यक्तीविषयी सांगितले.अनिल साहू बाहेर गेले आणि त्या व्यक्तीसोबत बोलत होते. बोलत असताना त्या व्यक्तीने अनिल यांना काहीतरी विचारलं.त्यावर अनिल यांनी मान हलवून नकार दिला.
आणि त्यानंतर त्या व्यक्तीने कपाळावर बंदूक लावून गोळी झाडली आणि त्यांचा खून केला. त्यानंतर आरोपी इमारतीच्या बाहेर थांबलेल्या एका दुचाकीवर अज्ञात साथीदारासह दुचाकीवरुन पळून गेला. घटनेची माहिती मिळं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास खडक पोलिस करीत आहेत.