पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुणे शहरातील स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रिडा मंदिराजवळ एका दुचाकी चालकावर बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. बुधवारी १९ जुलै २०२३ पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे . पिस्टल मधून तीन राउंड फायर करण्यात आले असून संबंधित व्यक्ती यामध्ये गंभीर जखमी झाल्याचे बोलले जात आहे.
त्या व्यक्तीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.घटनास्थळी रक्ताचे डाग आणि तीन पुंगळ्या आढळून आल्या आहेत.दरम्यान हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला आहे , हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
गणेश कला क्रीडा मंदीर जवळील डायमंड हॉटेल समोरील रस्त्यावर गोळीबाराची ही घटना घडली आहे. रिक्षातून जात असलेल्या अज्ञात व्यक्तीने दुचाकीवरील एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.