पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुण्यातील मध्यवर्ती भागात चोरट्यांनी एटीएम मध्ये डल्ला मारताना अलार्म वाजला आणि चोर पोलिसांच्या हाती अलगद आला. ही घटना पुण्यातील केळकर रोडवरील कासट बंगल्या जवळील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये शुक्रवारी दुपारी दीड ते अडीच दरम्यान घडली. एका व्यापाऱ्याने एटीएममधून पैसे काढले. पैसे मोजले जात असल्याचा आवाजही आला.
पैसे काढल्याचा मेसेजही मोबाईलवर आला. पण, एटीएममधून पैसे मिळाले नाही. तेव्हा व्यापाऱ्याने आपल्या मुलीला तेथे थांबवून बँकेत तक्रार करायला गेले. इकडे दोघे जण आत शिरले व पैसे काढू लागले. त्याचवेळी सिक्युरिटी अलार्म वाजला.तो ऐकून सुरक्षा रक्षक व रस्त्यावरील वाहतूक पोलीस तिकडे धावले. हे पाहून त्यांच्यातील एक चोर पळून गेला. पोलिसांनी एकाला पकडले आहे.
संतोष ब्रिजेश कुमार वय २४, सध्या रा. चिखली, मुळ रा. प्रतापगढ, असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत राजेश महेंद्रलाल शहा वय ५३, रा. सदाशिव पेठ, यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यापारी असून ते कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये गेले. त्यांनी पैसे काढण्यासाठी कार्ड टाकले. १० हजार रुपये काढण्यासाठी एन्ट्री केली. त्यानंतर एटीएम मशीनमधून पैसे मोजले जात असल्याचा आवाजही आला. त्यांना मोबाईलवर मेसेजही आला. परंतु पैसे बाहेर आले नाहीत. त्यांनी कार्ड बाहेर काढले. आपल्या मुलीला बोलावून घेतले. तिला सांगितले तू इथे थांब. मी बँकेत तक्रार करुन येतो. ते बँकेत गेले असतानाच मुलीचा फोन आला. तीने काय घडले ते सांगितले.
फिर्यादी बाहेर गेल्यानंतर दोघे जण चोरटे आत शिरले. त्यांनी पैसे काढण्याच्या ठिकाणी पट्टी लावली होती. त्यामुळे फिर्यादी यांचे पैसे अडकले होते. ते पैसे ते दोघे जण काढत असताना एटीएममध्ये काहीतरी बदल करत असल्याने सिक्युरिटी अलार्म वाजण्यास सुरुवात झाली. त्याबरोबर सुरक्षा रक्षक व रोडवरील वाहतूक पोलीस तिकडे धावले. अलार्म वाजल्याने घाबरुन दोघे जण बाहेर येऊन पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले. सुरक्षारक्षक व वाहतूक पोलिसांनी संतोष कुमार याला पकडले.
तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी सांगितले की, संतोष कुमार व त्याचा साथीदार या दोघांनी हे कृत्य केले आहे. संतोषकुमारचे बी.ए.पर्यंत शिक्षण झाले आहे. सध्या तो चिखली येथे राहतो. एटीएममध्ये धातूची पट्टी लावण्याचे काम आपल्या साथीदाराने केले असून आपण त्याच्या बरोबर होतो, असे तो सांगत आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.