वाहतूक सुरळीत करण्याचे सोडून नागरिकांची अडवणूक करून वसुल केला जातोय झिजया कर?
गोटीराम भैय्या चौकात एकट्या सुखदेव रामानेची ड्युटी, परंतु वसुलीसाठी सहा-सात जण?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
ट्राफिक पोलिस हे वाहतूक सुरळीत करण्यासाठी असतात का? रस्त्यावर थांबून लाच घेण्यासाठी? हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होत आहे.काही दिवसांपूर्वीच स्वारगेट ट्राफिक पोलिस नागरिकांकडून पैसे घेऊन दंडात्मक कारवाई न करता सोडले जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याची तातडीने दखल घेऊन वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दोघांना निलंबित केले होते. ते पाहून तरी वाहतूक पोलीस चिरीमिरी बंद करतील अशी आशा पुणेकरांना होती. परंतु ती आशा आता धुळीस मिळाली आहे?
खडक वाहतूक पोलिस वारंवार चर्चेत असताना देखील त्याकडे वरिष्ठ दुर्लक्ष करत असल्याने, त्या चिरीमिरी बहाद्दरांची हिम्मत वाढत चालली आहे. खडक वाहतूक पोलिसांनी आज २२ जून रोजी गोटीराम भैय्या चौकात सुखदेव रामाने यांची एकट्याची ड्युटी लावली होती. परंतु रामाने व्यतिरिक्त एकुण सहा-सात जणांची टोळी सक्रिय होऊन पुणेकरांची लुट करत असल्याचे पुरावे पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधींकडे आले आहे.
नो एंट्री मधून आलेल्या नागरिकांना अडवून रामाने हे पंधराशे रूपये मागून शेवटी दोनशे रूपये ( शंभर शंभरच्या दोन नोटा) घेऊन खिशात घालतानाचे व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाले आहे. एका ठिकाणी सहा सात वाहतूक पोलिस थांबून लूट करत असताना देखील खडक वाहतूक पोलिस निरीक्षक याकडे दुर्लक्ष का करत आहेत? कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास ते सपशेल फेल तर झाले नाही ना? असा प्रश्न या व्हिडिओतून समोर आला आहे. किंवा त्यांचा छुपा पाठिंबा तर नाही ना? अशी चर्चा पुणेकरांमध्ये रंगली आहे.
एकापेक्षा जास्त वाहतूक पोलिस एका ठिकाणी थांबू नये असे आदेश असताना देखील, खडक वाहतूक पोलिसांनी ते आदेश पायदळी तुडवले आहेत. विषेश म्हणजे ज्या गोटीराम भैय्या चौकात पुणेकरांची लूट होत असते, त्याठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी व चोरांना आणि लूटमारीच्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी पोलिसांनीच सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. आणि त्याचे मॉनिटरिंग पोलिस आयुक्त कार्यालय व वाहतूक शाखेत केले जात असताना देखील, वाहतूक पोलिसच लूटमारीचे प्रकार करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तरी चिरीमिरी बहाद्दारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार व वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर हे निलंबनाची कारवाई करणार का? असा प्रश्न पुणेकरांनी विचारला आहे. आता काय कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष टिकून राहणार आहे.