पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे शहरातील एन्जॉय ग्रुप च्या काही लोकांना अटक करण्यात आली आहे. सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदाराला पूर्ववैमनस्यातून मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी “एन्जॉय ग्रुपच्या” ७ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ७ पिस्तुल आणि तब्बल २३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्यातून पुढे होणाऱ्या मोठ्या गुन्ह्यांना आळा घालण्यात लोणीकंद पोलिसांना यश आले आहे.
शुभम ऊर्फ मॅटर अनिल जगताप (वय २७), सुमित उत्तरेश्वर जाधव (वय २६), अमित म्हस्कु अवचरे (वय २७), ओंकार ऊर्फ भैय्या अशोक जाधव (वय २४), अजय ऊर्फ सागर बाळकृष्ण हेगडे (वय २७), राज बसवराज स्वामी (वय २६), लतिकेश गौतम पोळ (वय २२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी व साक्षीदार हे सराईत गुन्हेगार असून दहीहंडीचा कार्यक्रम संपवून ते परत येत असताना त्यांचा विरोधक सुमित उत्तरेश्वर जाधव व इतरांनी पूर्ववैमनस्यातून कोलवडी परिसरात त्यांच्यावर हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना तपासात हा गुन्हा हडपसर, स्वारगेट, लोहियानगर येथील एन्जॉय ग्रुपमधील सदस्यांनी केल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने तपास पथकाने हडपसर, भेकराईनगर परिसरात तळ ठोकून एन्जॉय ग्रुपमधील सदस्यांची माहिती प्राप्त केली.
त्यात ८ जणांची नावे निष्पन्न झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांना मिळालेल्या बातमीनुसार शुभम जगातप व सुमित जाधव यांना मुंढवा परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले.सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे व पथकाने आरोपीकडे इतर साथीदारांबाबत विचारपूस करुन कात्रज येथील नवले ब्रीज परिसरात शोध घेऊन सापळा लावून इतर ५ जणांना पकडले.
अमीत अवचरे व सागर हेगडे यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे २ पिस्टल व ९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपींना अटक करुन त्यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली. पोलीस कोठडी असताना आरोपीकडून देशी बनावटीचे ४ पिस्टल व १२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
या गुन्ह्याच्या तपासात ७ आरोपीना अटक करुन त्यांच्या ७ पिस्टल व एकूण २३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. गुन्हा करण्यासाठी वापरलेली दोन वाहने, ७ मोबाईल असा एकूण ९ लाख १४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.