बऱ्याच दिवसापासून हा खेळ रंगत होता. तेथे घिरट्या घालणाऱ्या पोलिसांना का दिसले नाही?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंदे खपवून घेणार नाही असा सज्जड दम भरला तरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मात्र सगळं आलबेल असल्याचे चित्र स्थानिक नागरिकांना दिसत आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे अवैध धंदे चालू असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असे पोलिस आयुक्तांनी आदेश काढून ही आज अनेक ठिकाणी अवैध धंद्यांचा पुर आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका लॉजवर पत्त्यांचा खेळ चालू असल्याने काल कारवाई करण्यात आली आहे.
शिवाजीनगर येथील गंधर्व लॉजमध्ये बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा घालून जुगार खेळणाऱ्या ६ प्रतिष्ठित व्यक्तींना पकडले आहे. त्यांच्याकडून पौंड, डॉलर या परदेशी चलनासह ६ लाख ३७ हजार २९० रुपयांचा ऐवज जप्त केला.
तर जुगार खेळण्यासाठी खोली उपलब्ध करुन देणारे हॉटेल मालक शेट्टी व चालक सचिन मेश्राम यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१) गौरव संपत राठोड वय २९, रा. गंगाधाम मार्केटयार्ड, २) हरिश फुटरमल सोलंकी वय ५४, रा. कोर्णाक प्लस, सोपान बाग, ३) रितेश जयंतीलाल ओसवाल वय ३४, रा. राजलक्ष्मी सोसायटी,मार्केटयार्ड, ४) पराग आनंदराव मुथा वय ४१, रा. गगनविहार, मार्केटयार्ड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस अंमलदार सचिन चंद्रकांत जाधव यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार सचिन चंद्रकांत जाधव यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की, शिवाजीनगर येथील गंधर्व लॉज येथे जुगार चालू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, हवालदार चव्हाण, मोहिते, पवार, पोलीस अंमलदार दडस, सांगवे, तायडे यांनी गंधर्व लॉजमधील पहिल्या मजल्यावरील खोलीवर छापा टाकला.
तेव्हा तेथे ६ जण पत्ते खेळत होते. गौरव राठोड याला विचारल्याने त्यांनी आम्ही सर्व जण तिर्रट नावाचा तीन पत्ती जुगार पैशांवर खेळत असल्याचे सांगितले.
त्यांच्यासमोर वेगवेगळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या कॉईन होत्या. त्यातील हिरव्या रंगाच्या कॉईनची किंमत २० रुपये, लाल रंगाचे कॉईनची किंमत १०० रुपये व काळ्या रंगाच्या कॉईनची किंमत १ हजार रुपये असल्याचे सांगितले.
या सर्वांची झडती घेऊन त्यांचे मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य असा ६ लाख ३७ हजार ९०० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अजित बडे अधिक तपास करीत आहेत.
अधिक माहिती घेतली असता बऱ्याच दिवसांपासून सदरील ठिकाणी हा खेळ चालू होते. तर काही पोलिसांचे तेथे येणेजाणे असल्याचे देखील बोलले जात आहे. यासंदर्भात वरिष्ठांनी चौकशी करावी अशी मागणी देखील होत आहे.