पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुणे महापालिकेच्या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील कर विभागातील विभागीय निरीक्षकावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.इमारतीचा मिळकत कर तक्रारदार यांच्या नावावर करुन देण्यासाठी आणि जूना मिळकत कर न लावण्यासाठी २० हजार रुपये लाच मागणाऱ्या पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय धनकवडी येथील कर विभागातील विभागीय निरीक्षकावर पुणे एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.
संजय बबन काळे वय ४५ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विभागीय निरीक्षकाचे नाव आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सोमवारी ही कारवाई केली.याबाबत ३१ वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे.त्यानुसार अधिकाऱ्यांनी १४ जुलै आणि २८ जुलै रोजी पडताळणी केली होती.यावेळी विभागीय निरीक्षक काळे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदार यांच्या इमारतीचा मिळकत कर त्यांच्या नावावर करुन देण्याकरीता व जुना मिळकत कर न लावण्यासाठी विभागीय निरीक्षक काळे यांनी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाच मागितली.
मात्र तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता विभागीय निरीक्षक काळे याने तडजोडीमध्ये २० हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
पुणे एसीबीने सोमवारी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात संजय काळे याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस उप-अधीक्षक शितल घोगरे करीत आहेत.