पुण्यातील धक्कादायक घटना, वाहतूक महिला पोलीस अधिकाऱ्याला जीवंत जाळण्याचा प्रयत्न.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

पुण्यातील वाहतूक महिला पोलिस अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिस दलात मोठ्ठी खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालून त्यांना मारहाण करण्याच्या घटना सध्या पुण्यात घडत आहेत. मात्र, गुरुवारी सायंकाळी पुण्यातील मध्यवस्तीमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करत असताना एका मद्यपीने वाहतूक शाखेच्या महिला अधिकाऱ्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.

हा धक्कादायक प्रकार फरासखाना वाहतूक विभागाच्या कार्यालयाजवळ सायंकाळी साडेसहा ते पावणे सात वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एका मद्यपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

या घटनेत महिला सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर व पोलीस हवालदार समीर सांवत हे दोघे जखमी झाले आहेत. संजय फकिरबा साळवे वय-३२ सध्या रा. पिंपरी-चिंचवड मुळ रा. पिंपळगाव शेला, पो. जवखेडा बुद्रुक, जि. जालना, याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत वाहतूक विभागाचे पोलीस अंमलदार समीर प्रकाश सावंत वय-३८ यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आरोपी मद्य प्राशन करुन वाहन चालवताना वाहतूक पोलिसांना मिळून आला. पोलीस त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत होते. त्यावेळी त्याने पोलिसांच्या हातातील मशीन हिसकावून घेतली. हा प्रकार समजल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर त्याठिकाणी आल्या.वाहतूक पोलिसांनी आरोपीला थांबवून ठेवले होते.

काही समजण्याच्या आताच आरोपीने पेट्रोल सदृश्य ज्वलनशील पदार्थ जानकर आणि सावंत यांच्या अंगावर टाकला. त्यानंतर त्याने लाईटरने दोघांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर आरोपी साळवे विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here