पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे महानगर पालिकेच्या महिला अधिकाऱ्याचा पाठलाग करून वारंवार त्रास देणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पालिकेत बरीचशी चर्चा सुरू होती. गुन्हा दाखल झाल्याने चर्चा आता ठंड होणार आहे.
महापालिकेतील महिला अधिकाऱ्यांकडे काही काम नसताना त्यांचा वारंवार पाठलाग करुन त्यांची बदनामी करुन चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱ्या भाजपचा पदाधिकारी ओंकार कदम याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ओंकार कदम रा. मॉडेल कॉलनी, अक्षय कांबळे व त्याचे ६ साथीदार यांच्यावर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २४ जानेवारी पासून आतापर्यंत सुरु होता.
ओंकार कदम हा महापालिकेतील एका वैद्यकीय महिला अधिकाऱ्याला दमदाटी व छळ करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.महापालिकेच्या आवारात येऊन तो हा प्रकार राजरोसपणे करत होता. परंतु, सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असल्याने या महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीची कोणी दखल घेतली नाही.
फक्त पोलिसांना एक गोपनीय पत्र देऊन या घटने संदर्भातील माहिती दिली होती. तत्कालीन महापालिका आयुक्त राजेश भोसले यांनी कोणतीही कारवाई केली नाही. शेवटी या महिला अधिकाऱ्यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. त्यांनी याची दखल घेऊन महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले. नुकतेच बदली होऊन पुणे महापालिकेत आलेले नवल किशोर राम यांनी यावर कारवाई करुन ओंकार कदम व त्याच्या साथीदारांना महापालिका आवारात येण्यास बंदी घातली.
परंतु, त्याच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नव्हता. शेवटी मंगळवारी रात्री पोलिसांनी या महिला अधिकाऱ्याची फिर्याद घेऊन ओंकार कदम व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी यांचे फिर्यादी यांच्याकडे काही काम नसताना त्यांचा वारंवार पाठलाग करुन त्यांच्या विभागाचे शिपाई व अधिकारी यांचे समक्ष वाईट शब्द वापरून फिर्यादी यांची नाहक बदनामी करून चारित्र्यावर शिंतोडे उडाल्याने त्यांना त्रास सहन होत नसून त्यांची घुसमट केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हिरे तपास करीत आहेत.