परंतु काही ठिकाणी कारवाई तर काही ठिकाणी डोळेझाक.
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी
कोंढव्यात बेकायदेशीर होर्डिंग उभारून लाखो रुपयांचा मलिदा लाटला जात असल्याची बातमी पुणे सिटी टाईम्सने प्रसिद्ध केली होती. त्या अनुषंगाने थोडीफार कारवाई करून अधिकारी मिस्टर इंडिया सारखे गायबच झाले होते. तर पुणे सिटी टाईम्सचा सातत्याने पाठपुरावा चालू होता. दिवाळीत बेकायदेशीर होर्डिंगवर लाखो रुपये कमावले जाऊ शकतात, यामुळे कारवाई दिवाळीपूर्वीच व्हावी व पालिकेचा तोटा वाचावा म्हणून सातत्याने पाठपुरावा चालू होता.

परंतु गेंड्याच्या कातडीचे अधिकारी दिवाळी होऊन व पालिकेचा दिवाळा निघूनही मस्तवाल होते. अखेर पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे बेकायदेशीर होर्डिंगधारकांना पाठीशी घालणाऱ्या व कामचुकारपणा करणाऱ्या भारत गायकवाड यांच्याविरोधात निलंबनाची मागणी करताच खळबळून जागे झालेले अधिकारी व कर्मचारी तोंड बघून का होईना, कारवाई करू लागले.

काल रात्री कोंढवा वेलकम चौकातील ४ होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. परंतु त्या कारवाईचा लोखंडी सांगाडा तेथेच सोडून अधिकारी रफूचक्कर झाले.
मागील बातमी }}} pune| बेकायदेशीर होर्डिंगधारकांना पाठीशी घालणाऱ्या आकाशचिन्ह परवाना निरीक्षकावर कारवाईची मागणी.
कधी तो सांगाडा उचलून नेला असता तर पुन्हा त्या जागेवर होर्डिंग उभे राहिले नसते. मागच्या वेळी आकाश चिन्ह परवाना निरीक्षक मिलिंद पंगारे यांनीही कारवाई केली होती. परंतु त्या ठिकाणी वारंवार होर्डिंग उभ्या राहिल्या. आज पुन्हा भारत गायकवाड यांनी कारवाई केली आहे.
परंतु कारवाईचा खर्च किती वसूल करण्यात आला, याची माहिती घेण्यासाठी गायकवाड यांना संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही. अधिक माहिती घेण्यासाठी हडपसर-मुंढवा क्षेत्रीय अधिकारी यांना संपर्क केला असता त्यांनीही फोन उचलला नाही.
“मेफेअर समोरील होर्डिंगला राजकीय अभय, तर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची हतबलता.”

मेफेअर सोसायटीच्या समोरील बाजूस एका माजी आमदाराच्या नातेवाईकाची बेकायदेशीर होर्डिंग उभी असतानाही त्यावर कारवाई करण्यासाठी पालिकेतील अधिकारी-कर्मचारी भीत आहेत. कायद्यापेक्षा हे बेकायदेशीर होर्डिंग उभारून लाखो रुपयांचा मलिदा लाटणारे सर्वश्रेष्ठ झाले आहेत. या होर्डिंगवर कारवाई कधी होणार? किंवा यात पालिकेच्या अधिकाऱ्यांचे साटेलोटे तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.




