पोलिस दलात नाराजीचे सुर..
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
कोणता वाद कधी विकोपाला जाईल या बाबतीत सांगता येत नाही. वाहतूक पोलीस ड्युटीवर असताना त्या सोबत भयंकर प्रकार घडला आहे. वाहतूक नियंत्रणाचे काम करत असलेल्या वाहतूक पोलिसाला २ महिलांनी थेट चप्पलीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार आजिनाथ आघाव हे हडपसर वाहतूक विभागात कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास गाडीतळ परिसरात बेशिस्तपणे लावलेल्या दुचाकींवर कारवाई सुरू होती. यावेळी टोइंग व्हॅन कर्मचाऱ्यांनी आरोपी महिलांची दुचाकी उचलण्यास सुरुवात केली असता, संबंधित महिलांनी या कारवाईला विरोध केला.
यावेळी बालिका सूर्यवंशी आणि संगीता लांडगे या दोघींनी हवालदार आघाव यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि संतप्त महिलांनी आघाव यांना चप्पलीने मारहाण करत धक्काबुक्की केली. तसेच त्यांना धमकीही दिल्याचे सांगितले आहे.
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन्ही महिलांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख करीत आहेत. भर चौकात पोलिसाला चप्पलीने मारहाण झाल्याने पोलीस दलातून नाराजी व्यक्त केली जात आहे.